होमपेज › Solapur › दोन वर्षांपासून सोलापूरच्या ‘सुकन्या’ लाभापासून वंचित

दोन वर्षांपासून सोलापूरच्या ‘सुकन्या’ लाभापासून वंचित

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 11 2018 10:27PMसोलापूर : दीपक होमकर

अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सरकार एकीकडे ‘मुली वाचवा’ अभियानावर जोर देत असताना महापालिकेत मात्र या अभियानाला बळ देणारी ‘सुकन्या’ योजना बासनात बांधली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकाही लाभार्थ्याच्या नावावर पैसे जमा केले नसल्याने योजनेस पात्र महापालिकेच्या या ‘सुकन्या’ गेल्या दोन वर्षांपासून लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ‘मुली वाचवा’ अभियानाला बळ देण्यासाठी ‘सुकन्या’ योजना सुरु केली होती. त्याअंतर्गत एका मुलीवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे पाच हजार आणि दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केल्यास दोघींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवण्याची ही योजना होती. मात्र गेल्या दोन वर्षांत  या योजनेसाठी सुमारे पन्नासवर प्रस्ताव आले. महापालिकेने महिला व बालकल्याणला दिलेल्या बजेटनुसार  आलेल्या प्रस्तावाला चाळणी लावत 23 अर्ज वैध ठरविले. ते अर्ज महिला व बालकल्याण विभागाकडून लेखा कार्यालयाकडे गेले खरे मात्र तेथून त्या 23 लाभार्थ्यांसाठी ठेवी ठेवण्यासाठी पैसेच आले नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही योजना केवळ मंजुरी मिळालेल्या प्रस्तावापर्यंतच थांबली आहे. एक  वा  दोन  मुलींवर कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करणार्‍या त्या दाम्पत्यांच्या मुलींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपयांची एफडी ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत ठेवण्याची योजनाच आहे. मात्र लाभार्थी मुली दोन-तीन वर्षाच्या होऊन गेल्या तरी  त्यांच्या नावे एफडी केली गेली नाही. पाच वर्षांच्या मुलींना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र प्रस्ताव सादर केला त्यावेळी तीन वर्षांच्या मुली आता पाच वर्षांच्या पुढे गेल्या आहेत. आता त्यांना लाभ मिळणार की नाही, अशी शंका लाभार्थी पालकांनी व्यक्त केली. 

असे आहेत निकष
एक लाखाच्या आतील उत्पन्न, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करतेवेळी  दोन्ही मुलींचे वय वर्ष 5 पेक्षा कमी, खासगी दवाखान्यात शस्त्रक्रिया केली  तरी सरकारी दवाखान्यातून त्याचे प्रमाणपत्र घेणे  हे निकष पूर्ण करणार्‍या मुलींनाच लाभ मिळणार आहे.

सभापती देणार आयुक्‍तांना पत्र
गेल्या वर्षात महिलादिनानिमित्त महिलांच्या सत्काराचा कार्यक्रम सोडला तर महिला व बालकल्याण विभागाकडून कोणतेच मोठे विधायक कार्यक्रम झाले नाहीत. गतवर्षीचे बजेट खूप उशिरा झाले. त्याचा मोठा फटका आम्हाला बसला. मात्र गेल्यावर्षीच्या लाभार्थ्यांना किमान यावर्षी तरी लाभ द्यावा, असे पत्र आयुक्तांना पाठविणार असल्याचे महिला व बालकल्याण समिती सभापती रामेश्‍वर बिर्रु यांनी सांगितले.
 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex