Mon, Sep 16, 2019 05:34होमपेज › Solapur › रस्त्यासाठी मतदानावर शेतकरी टाकणार बहिष्कार

रस्त्यासाठी मतदानावर शेतकरी टाकणार बहिष्कार

Published On: Apr 08 2019 2:03AM | Last Updated: Apr 08 2019 12:11AM
बार्शी : तालुका प्रतिनिधी 

बार्शी तालुक्यातील कारी ते टोणेवाडी या 31 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्‍नांवरून टोणेवाडी व कारी येथील शेतकर्‍यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हा अधिकारी यांना दिला आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले कारी हे गाव द्राक्षे पिकापासून परकीय चलन मिळवून देणारे गाव आहे. टोणेवाडी व कारी गावामध्ये पूर्वीपासून सर्वच गोष्टींची देवघेव आहे. दोन्ही गावचा मुख्य व्यवसाय फळबागा, फुले, कांदा उत्पादन आहे.

कारीच्या पश्‍चिमेस पाच किलोमीटर अंतरावर  टोणेवाडी असून दोन्ही गावे याच मार्गानी एकमेकांस जोडलेली आहेत. कारीतील लोकांना याच मार्गावरून बार्शीकडे जाताना अंतर कमी होत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. टोणेवाडीतील लोकांना उस्मानाबाद बाजारपेठेसाठी एकमेव हाच रस्ता जवळचा आहे. भौगोलिकदृष्ट्या कारी गावचे सुपीक क्षेत्रफळ असलेले हजारो हेक्टरवर जमीन याच दिशेला येते. शेतीमधील पिकवले जाणार्‍या द्राक्ष, मोसंबी व फुले दैनंदिन खर्च भागवण्यासाठी असणारे दूध उत्पादक  शेतकरीवर्गाला कारी ते टोणेवाडी एकमेव रस्त्याशिवाय पर्याय नाही. टोणेवाडी गावातून कारी येथील शाळेत व कॉलेजला जाण्यासाठी याच मार्गावर जावे लागते. या रस्त्यावर ठिकठिकाणी बेसुमार वृक्ष वाढले आहेत. भूमीअभिलेखच्या नोंदीप्रमाणे कुठलेही मानांकन राहिले नसून दोन्ही बाजूंनी असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी अतिक्रमणे करून रस्ता संपुष्टात आणला आहे. परिणामी दोन्हीं गावचे दळणवळण बंद पडण्याच्या मार्गावर आले आहे. याच रस्त्यावर सटवेश्‍वरी वस्ती, विधाते व करडे वस्ती असून शेतीमाल व फुले पिकवणारा शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बार्शीला दूध विक्री करण्यासाठी व उस्मानाबाद बाजारपेठमध्ये रोज फुले पाठवण्यासाठी टोणेवाडी फुले उत्पादकांना याच मार्गावरून जावे लागते. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना तसेच दूध व फुले आणताना नरकयातना भोगावे लागतात. अनेक शेतकर्‍यांनी रस्त्यासाठी अधिकारी व राजकीय नेत्यांच्या दृष्टीक्षेपाखाली प्रश्‍न घातला. परंतु कोणीही गावकर्‍याची  व शेतकरी गरज ओळखली नाही.गतवर्षी पावसाळ्यात एका व्यक्तीला विजेचा धक्का बसला होता.परंतु उपचारासाठी रस्त्याच्या अभावामुळे विलंब झाला व सदर व्यक्ती गतप्राण झाल्याची घटना याच शिवारात झाली आहे. सडक ले जाती है समृद्धी की ओर, या भारत सरकारच्या घोषणेचा सोलापूर जि.प. बांधकाम विभागाला विसर कसा पडला? हाच प्रश्‍न सर्वांना पडला आहे. अशा दोन्ही गावाचा व वस्त्याची नाळ जोडणारा गरजेचा रस्ता दोन्ही गावाचा कायमस्वरूपी बदल करण्यासाठी रस्त्याची सुधारणा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा संशोधन आणि विकास योजनेतून तात्काळ मंजूर करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. 

या रस्त्याची प्रादेशिक जिल्हा मार्ग क्र. 171 अशी जिल्हा परिषदेच्या विभागात नोंद आहे.  1988 मध्ये याच रस्त्यावर मातीकाम झाले होते. तेव्हापासून रस्त्याच्या कामासाठी कोणत्याही राजकीय तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही.  रस्त्याचे मातीकाम पावसाळ्यात पाण्याच्या ओघळी पडून वाहून गेले आहे. त्यामुळे या रस्ता दुरूस्तीची मागणी आहे.