Wed, Jul 17, 2019 16:48होमपेज › Solapur › मद्यधुंद शिक्षकाकडून कर्मचार्‍यास बेदम मारहाण

मद्यधुंद शिक्षकाकडून कर्मचार्‍यास बेदम मारहाण

Published On: May 17 2019 1:47AM | Last Updated: May 16 2019 10:15PM
कुर्डूवाडी : प्रतिनिधी

वेतनासंदर्भातील नियमबाह्य काम करुन घेण्यासाठी एका प्राथमिक सहशिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायकास दमदाटी, शिवीगाळ करुन मारहाण केली. याच्या निषेधार्थ कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले. शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असून प्रशासकीय कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

रत्नाकर सर्जेराव ढवळे (रा. सापटणे) असे गुन्हा दाखल झालेल्या सहशिक्षकाचे नाव आहे. तो जि.प. प्राथमिक शाळा, आहेरगाव येथे कार्यरत आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक विशाल विलास घोगरे यांना मारहाण झाली. 

बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास घोगरे हे कार्यासनावर असताना रत्नाकर ढवळे या सहशिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत येऊन वेतनासंदर्भातील नियमबाह्य काम करण्यासाठी घोगरे यांना दमदाटी, शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना समजताच पंचायत समितीच्या विविध विभागांतील कर्मचार्‍यांनी शिक्षण विभागाकडे धाव घेऊन घोगरेंची ढवळेंच्या तावडीतून सुटका केली.

मारहाणीच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या सर्वच विभागांतील कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून पंचायत समिती कार्यालयाबाहेर ठाण मांडले. जोपर्यंत ढवळे याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलनाची भूमिका गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी व गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे यांच्याकडे मांडली. यामुळे दुपारी 12 पासून सायंकाळपर्यंत  काम ठप्प झाले होते.