होमपेज › Solapur › जिल्हा दुष्काळाच्या छायेत

जिल्हा दुष्काळाच्या छायेत

Published On: Aug 10 2018 11:56PM | Last Updated: Aug 10 2018 11:56PMसोलापूर : प्रतिनिधी  

सध्या सोलापूर जिल्ह्यातील 76 हजार हेक्टरवरील खरीप पीक धोक्यात आले असून गेल्या 25 दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे काळे ढग जमा झाले असून तसा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र हे 76 हजार हेक्टर आहे. मात्र, यंदा सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने खरिपाची पेरणी अधिक झाली होती. त्यामुळे जवळपास दुप्पट अर्थात दीड लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती; मात्र सध्या पावसाने चांगलीच दडी मारली आहे. त्यामुळे तूर, उडीद, मूग, भुईमूग, तीळ, सूर्यफुल तसेच भात, मका आणि ज्वारीची पिके सध्या दुष्काळाच्या छायेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास यंदाचे खरीप हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील पिके संकटात सापडली असून या तालुक्यांत तातडीने पावसाची गरज आहे. मात्र पाऊस  पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गतवर्षी आजपर्यंत 488 मि.मी. पाऊस अपेक्षित होता; मात्र सध्या 200 मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या 50 टक्के पाऊस पडला असल्याने अधिक पावसाची जिल्ह्याला गरज आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर हातातोंडाला आलेली पिके आता वाया जाणार असल्याने बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. मात्र निसर्गापुढे आता कोणाचेच काही चालणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन व्हावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

सद्यःस्थितीचा अहवाल शासनाला पाठविणार 
गेल्या 25 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब आहे. यंदा खरिपाचे सरासरी क्षेत्र 65 हजार हेक्टर होते; मात्र पेरणी दीड लाख हेक्टरवर झाली आहे. त्यापैकी 76 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली असून अक्‍कलकोट, बार्शी आणि दक्षिण सोलापूर सध्या दुष्काळाच्या छायेत असून तसा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.