Sat, Aug 24, 2019 10:31होमपेज › Solapur › प्रतीकच्या मारेकर्‍यांचा शोध लागेना

प्रतीकच्या मारेकर्‍यांचा शोध लागेना

Published On: Nov 04 2018 1:18AM | Last Updated: Nov 03 2018 10:33PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

माचणूर येथील अपहरण झालेल्या नऊवर्षीय प्रतीक शिवशरण याची निर्घृण हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यापासून मारेकर्‍यांचा शोध लागत नसल्याने जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे शैला गोडसे, प्रा. येताळा भगत व शिव बुद्ध युवा प्रतिष्ठान आदींनी मंगळवेढा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहेत. येथील पोलिस उपविभागीय अधिकारी 
कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत मारेकरी सापडणार नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला आहे. प्रतीकच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास तब्बल 22 तास उशीर केल्याबद्दल शिवशरण कुटुंबीयांमध्ये असंतोष आहे. प्रतीकचे शवविच्छेदन सोलापूर येथे करत असताना तो मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र, सोलापूर पोलिसांनी या गुन्ह्यातील तपास पूर्ण झाल्याशिवाय इतर काम हाती घेणार नाही, असा विश्‍वास दिल्याने कुटुंबीयांनी अखेर माचणूर येथे प्रतीकवर अंत्यसंस्कार केले. माचणूर येथील काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून चार पथके या तपासकामी काम करत आहेत. मात्र, अद्यापही ठोस अशी माहिती हाती लागली नसल्याने प्रतीकच्या हत्येचे गूढ वाढत चालले आहे.

शनिवारी प्रतीकचे अपहरण झाले. त्यानंतर त्याचा मृतदेह मंदिराजवळील उसाच्या शेतात गुरुवारी आढळून आला. मृतदेह हा अत्यंत खराब अवस्थेत असल्याने त्याची हत्या सोमवारी किंवा मंगळवारी झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजे अपहरण झाल्यापासून दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशीच त्याची हत्या करण्यात आली आहे. ज्यावेळी पोलिसांनी माचणूर परिसर पिंजून काढला. त्यावेळी त्या परिसरात शोध घेतला असता पोलिसांना मृतदेह मिळून आला नाही. मात्र,  गुरुवारी दुपारी मृतदेह त्या शेतात आढळला. जिथे बुधवारी पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना काही सापडून आले नव्हते. याचा अर्थ प्रतिकच्या मारेकर्‍यांनी त्याची हत्या इतरत्र कुठे तरी केली असण्याची शक्यता आहे.

माचणूर हे धार्मिक व पर्यटन ठिकाण आहे. या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असल्याने तंत्रविद्या, जादूटोणा, कालाजादू यासारख्या अघोरी प्रकारातून अनेक मांत्रिक, जादूटोणा करणारे पुजारी यांनी याअगोदर अनेकदा गैरमार्गाचा वापर केला आहे. मात्र नऊ वर्षे वय असणार्‍या या चिमुरड्या लहान मुलांचा काय दोष, की ज्याची त्याला आपला जीव गमावून किंमत मोजावी लागली.