Mon, Jul 06, 2020 17:40होमपेज › Solapur › सोलापुरी मी.तू..

सोलापुरी मी.तू..

Published On: Oct 29 2018 12:47AM | Last Updated: Oct 28 2018 8:31PMसंतोष आचलारे 

देशभरात मी टू च्या प्रकरणाची रोजंच नवी चर्चा व नवी नावे चर्चेत येत असताना इकडे सोलापुरातील राजकीय क्षेत्रात मात्र ‘मी.तू’..‘मी.तू’.. प्रकरणाने राजकीय क्षेत्र चांगलेच गाजत आहे. राजकारण म्हटलं की टीका टिप्पणी, विरोध, आरोप प्रत्यारोप हा नित्याचाच भाग झाला. निवडणुकीच्या काळात तरी अशा प्रकारांना अक्षरश: ऊत येत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. सोलापुरातील राजकीय क्षेत्रही यासाठी अपवाद नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेकदा राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आहेत. मात्र राजकारण करीत असताना एकमेकांच्या वैयक्‍तिक जीवनात घुसखोरी करून राजकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा पोरकटपणा यापूर्वी फारसा कधीच दिसून आला नाही. अलीकडच्या काही महिन्यापासून सोलापुरी मी.तू..प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींच्या खादी रंगाला काळीमा फासण्याचे काम होत आहे.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील व अक्‍कलकोट तालुक्यातील महिला प्रतिनिधी यांच्यावरून समोर आलेली ऑडीओ क्‍लिपची चांगलीच चर्चा झाली आहे. याप्रकरणी काय खरं अन काय खोटं अजून तरी समोर आले नसले, तरी राजकारणाचा पाया मात्र ढासळण्याचा प्रकार यामुळे झाल्याचे दिसून आले आहे. सुसंस्कृत संबोधल्या जाणार्‍या काँग्रेस पक्षातील आ. प्रणिती शिंदे यांनीही खा. शरद बनसोडे यांना बेवडा असे संबोधून आपली राजकीय परिपक्‍वता कमी असल्याचे दाखवून दिले आहे. खा. बनसोडे यांनीही याप्रकरणी लागलीच प्रतिक्रिया देत मुंबईची धमकी सोलापुरात दिली. या अशा प्रकारामुळे सोलापूरच्या कोणत्याही विकासाची साधी वीटही उभारली जाणार नाही.उलट राजकीय क्षेत्रातील आतापर्यंत असलेला लोकप्रतिनिधींचा आदरही कमी करणारा आहे. त्यामुळे यापुढील तरी काळात वैचारिक संतुलन ठेवून, किमान प्रत्येकाच्या खासगी आयुष्याकडे बोटं दाखविण्याचा प्रकार घडू नयेत. अशा प्रकरणाने कोणाचेही भले होणार नाही, असे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून सोलापूरकरांनी व्यक्‍त केले आहे. ही बाब राजकीय लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारीच आहे.

येत्या वर्षभरात लोकसभा व विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढील काळात राजकीय क्षेत्रातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी  वाढणारच आहेत. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कदाचित कांही लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारच्या विषयांचा आधार घेण्याचाही प्रकार होण्याची शक्यता आहे. मात्र सूज्ञ सोलापूरकरांनी अशा लोकप्रतिनिधींना भातातील खड्याप्रमाणे बाजूला सारुन विकासाची धमक व तळमळ असणार्‍या प्रगल्भ लोकप्रतिनिधींची निवड आपला नेता म्हणून  करण्याची वेळ येणार आहे, हे मात्र निश्‍चित आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, ज्येष्ठ राजकारणी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आदींनी राजकीय वाटचालीत राजकारण करताना वैयक्‍तिक टिकाटिप्पणीला फारसा थारा दिला नाही. त्यामुळेच राजकीय लोकप्रतिनिधींचे राजकारणापलीकडे जाऊन जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. याचा चांगला फायदा राज्याच्या विकासाकरीता झाला होता. राजकीय गणिते बाजूला सारुन प्रत्येकाच्या खासगी आयुष्यातील स्वतंत्रता शाबूत ठेवण्याची आचारसंहिता लोकप्रतिनिधींनी पाळली तरच त्यांच्याकडे पाहण्याचा द‍ृष्टीकोन भविष्यात चांगला राहणार आहे. मी टू चे प्रकरण शांत होत असताना सोलापूरातही आता तू.मी..चे प्रकरणे शांत व्हावीत, हीच सोलापूरकरांची अपेक्षा आहे.