Fri, Jun 05, 2020 02:29होमपेज › Solapur › धरणे, तलाव आटले

धरणे, तलाव आटले

Published On: May 17 2019 1:47AM | Last Updated: May 16 2019 10:20PM
अक्कलकोट : शिवाजी यळवार

चारा व पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी पशुधन कवडीमोल किमतीत विकत आहेत. यामुुळे जगायचे कसे, असा गंभीर प्रश्‍न शेतकर्‍यांना सतावत आहे. पाण्यासाठी जनता व्याकूळ झाली असतानाच वाढत्या तापमानाने बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्यामुळे तालुक्यातील तलाव व धरणांतील पाणीसाठे शून्यावर आले आहेत.

तीव्र पाणीटंचाई, अत्यल्प पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असून चार्‍याअभावी पशुधनावर संक्रांत आली आहे. या दुष्काळी परिस्थितीच्या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र झटत असल्याचे दृश्य तालुक्यातील प्रत्येक गावांत पाहावयास मिळत आहे. 

‘गाळमुक्त-जलयुक्त’साठी प्रयत्न

अक्कलकोट तालुका हा कायमच अवर्षणग्रस्त म्हणून गणला जातो. त्यातच झालेल्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील पाझर तलाव व साठवण तलाव कोरडेठाक पडल्याने शेतकर्‍यांच्या सहभागातून तालुक्यातील विविध तलावांतून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. त्याची गती संथ असल्याचे दिसते. ही लोकचळवळ बनविल्यास तालुका पाण्याच्यादृष्टीने स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. यामुळे पुढील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यास मदत होईल.

तालुक्यातील जेऊर, हंजगी, नगरपालिका क्षेत्रातील दुधनी नगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भाग तसेच अक्कलकोट शहरात तीव्र पाणीटंचाई आहे. शहरास आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. शहरातील ठिकठिकाणी नळांना तोट्या नसल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास शहरातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात ग्रामस्थांना पाण्यासाठी मैलोन्मैल वणवण भटकावे लागत आहे. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाही. दुष्काळी भागातील कूपनलिका, गावातील विहिरी, हातपंप यांची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. 

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव कोरडे पडले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शेती व पिण्यासाठी मोठा आधार ठरणारे पाझर तलाव कोरडे पडले. पाझर तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेकडो एकर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. 

कुरनूर धरणावर अक्कलकोट शहरासह तीन नगरपालिका आणि तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या मोहिमेचा फायदा त्यांनाही होणार आहे. सद्य:स्थितीत 4 पोकलेन आणि 25 ते 30 टिप्परच्या माध्यमातून गाळ उपसा करण्यात येत आहे. भविष्यकाळात गाळ उपसा वाढल्यास धरणातील पाणीसाठ्यात वाढ होईल.

गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात गाळ उपसा करण्याचे काम शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी स्वखर्चातून पुढे येऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. धरणातील व तलावातील गाळ शेतीत वापरल्याने जमिनीच्या सुपिकतेमध्ये वाढ होणार आहे. 

जूनपर्यंत कामे चालणार

कुरनूर धरणातील गाळ उपसा जोरात सुरू आहे. चुंगी, मोट्याळ, सिंदखेड येथील शेतकरी या धरणातील गाळ घेऊन जात आहेत. जूनपर्यंत हे काम चालू राहणार आहे. गाळ नेणार्‍या शेतकर्‍यांत दररोज वाढच होत आहे. आतापर्यंत सरासरी 11 लाख घनमीटर गाळ काढण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘अनुलोम’चेही योगदान

‘अनुलोम’च्या माध्यमातून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तोळणूर, हंजगी, भुरीकवठे, बोरगाव (दे), शिरवळवाडी, हालचिंचोळी, गळोरगी, चिक्केहळ्ळी, गोगाव या  तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरु असून शेतकरी स्वखर्चाने गाळ नेत आहेत. ‘अनुलोम’ कडून जेसीबी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  शासनाकडून इंधन खर्च उपलब्ध करुन दिला जात आहे. आतापर्यंत सरासरी 1 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित गाळ काढण्याचे काम चालू आहे. 

सहा तलावांमधील गाळ उपसा सुरू

कुरनूर, चपळगाव, बावकरवाडी, चुंगी येथील जवळपास सहा तलावांतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. स्वतः शेतकरी रात्रंदिवस पुढे राहून जमिनीत काळी माती टाकून घेत आहेत. ही मोहीम अधिक गतीने आणि मोठ्या प्रमाणात सुरू करण्याची गरज आहे. धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली. परिणामी भूजल पातळीत घट होऊन परिसरातील सर्वच प्रकल्प कोरडे पडले. या प्रश्‍नाचे गांभीर्य शेतकर्‍यांना उमगल्याने परिसरातील शेतकरी याकामी पुढे सरसावले आहेत.