Sun, May 31, 2020 09:59होमपेज › Solapur › खुनेश्वरात पाणीप्रश्नांवरून हाणामारी; आठ जणांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी

खुनेश्वरात पाणीप्रश्नांवरून हाणामारी; आठ जणांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी

Published On: Jun 12 2019 9:42PM | Last Updated: Jun 12 2019 9:42PM
मोहोळ : वार्ताहर 

मोहोळ तालुक्यात पाणी प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाडलेल्या बोर मधील बंद पडलेली मोटर काढण्याच्या कारणावरून सोमवारी, (१० जून) रोजी खुनेश्वर ता. मोहोळ येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. यात दोन्ही गटातील मिळून आठ जण गंभीर जखमी झाले असून मोहोळ पोलिसात ३१ जणांच्या विरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये चार महिलांचा देखील समावेश आहे. या प्रकरणी मोहोळ न्यायालयाने आठ जणांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अमर चंद्रहार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खुनेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार सध्या प्रशासनामार्फत सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी २ बोअर पाडल्या आहेत. त्यापैकी एका बोर मधील मोटार बिघडल्याने नागरीकांना पाण्याचा तुटवडा भासू लागला. ग्रामपंचायत प्रशासनाने सदरची मोटर दुरुस्त न केल्यामुळे माजी सरपंच चंद्रहार मोहन चव्हाण यांच्यासह गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सदरची मोटार दुरुस्त करण्याचे ठरवले. त्यासाठी १० जून रोजी रात्री आठ वाजता ते बंद पडलेली मोटार दुरुस्तीसाठी बाहेर काढत होते. त्यावेळी ब्रह्मदेव सुखदेव चव्हाण, भारत भागवत चव्हाण, मोहन भागवत चव्हाण, वसंत भागवत चव्हाण, विठ्ठल भारत चव्हाण, युवराज मोहन चव्हाण, प्रमोद संभाजी लोंढे, सचिन ब्रह्मदेव चव्हाण, योगेश वसंत चव्हाण, वैशाली मोहन चव्हाण, छाया भारत चव्हाण, सुनिता ब्रह्मदेव चव्हाण, अतुल दिलीप पाटील आणि वसंत भागवत चव्हाण यांची पत्नी (नाव माहित नाही) यांच्यासह अन्य चारजण सदर ठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी हातातील लोखंडी रॉड, लोखंडी चैन आणि काट्याने बोरची मोटर काढणाऱ्या नागरिकांना बेदम मारहाण केली. या मध्ये अमर चंद्रहर चव्हाण, अविनाश वसंत चव्हाण, ज्ञानेश्वर श्रीधर चव्हाण आणि बजरंग गेना चव्हाण हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वरील १४ जणांसह अन्य ४ जणांच्याविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, विठ्ठल भारत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंद्रहार मनोहर चव्हाण हे खुनेश्वरचे माजी सरपंच आहेत. ते ग्रामपंचायत बोरची मोटर काढून स्वतःच्या शेतीसाठी वापरतात. १० जून रोजी ते व त्यांचे साथीदार बोअर मधील मोटर काढत होते. त्यावेळी विठ्ठल चव्हाण यांच्यासह गावातील काही नागरिकांनी त्यांना विरोध केल्याने चंद्रहार मनोहर चव्हाण,अमर चंद्रहार चव्हाण, मोहन मनोहर चव्हाण, स्वप्नील मोहन चव्हाण, प्रमोद जरसन चव्हाण, ज्ञानेश्वर श्रीहरी चव्हाण, बजरंग गेना चव्हाण, अमोल जरासन चव्हाण, अविनाश वसंत चव्हाण, अजित वसंत चव्हाण, राम भारत चव्हाण, वसंत चांगदेव चव्हाण, लखन भारत चव्हाण (सर्व रा. खुनेश्वर ता. मोहोळ) यांनी विरोध करणाऱ्या नागरिकांना बेदम मारहाण केली. तसेच भारत चव्हाण यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मोहन भागवत चव्हाण, भारत भागवत चव्हाण, वैशाली मोहन चव्हाण आणि अतुल दिलीप पाटील हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी  वरील १३ जणांच्या विरोधात मोहोळ पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान मोहोळ पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपी चंद्रहार मनोहर चव्हाण, अमर चंद्रहार चव्हाण, ज्ञानेश्वर श्रीहरी चव्हाण, बजरंग गेना चव्हाण, अविनाश वसंत चव्हाण, ब्रह्मदेव सुखदेव चव्हाण, विठ्ठल भारत चव्हाण, योगेश वसंत चव्हाण, अतुल दिलीप पाटील या नऊ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, मोहोळ न्यायालयाने आठ आरोपींना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर पॅरालेससचा आजार व वृद्ध असल्याच्या कारणाने चंद्रहार मनोहर चव्हाण यांची जामिनावर मुक्तता केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पोपळे करीत आहेत.