होमपेज › Solapur › हात, हत्ती, धनुष्यबाणासह कमळाशीही पालकमंत्र्यांचा सामना

हात, हत्ती, धनुष्यबाणासह कमळाशीही पालकमंत्र्यांचा सामना

Published On: Jan 24 2019 1:33AM | Last Updated: Jan 24 2019 1:33AM
सोलापूर : प्रशांत माने

भाजपने काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावलेला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली असून आजी-माजी आमदारांसह दिग्गज पदाधिकार्‍यांची टीमच उत्तरसाठी काँग्रेसने तैनात केल्याने पालकमंत्र्यांसमोर यंदा तगडे आवाहन असणार आहे. शहर उत्तरमधून लढण्यासाठी बसपाचा हत्ती मैदानात तयार बसला असतानाच भाजपमधील अंतर्गत वादामुळे पक्षातूनही पालकमंत्र्यांना बंडखोरीचे आवाहन पेलावे लागण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना हत्ती, हातासह आता कमळाशीही सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. युती न झाल्यास धनुष्यबाणही मैदानात असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात पूर्वी तेरा विधानसभा मतदारसंघ होते. कालांतराने ही संख्या 11 वर आली. मंगळवेढा आणि तालुका उत्तर सोलापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ लुप्‍त पावले. सोलापूर शहराशी निगडीत शहर उत्तर, शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण असे तीन विधानसभा मतदारसंघ झाले. शहर उत्तर म्हणजे पूर्वीचा तालुका उत्तर सोलापूर हा राखीव मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने कौल देणारा होता. नंतर हा मतदारसंघ शिवसेनेने काबिज केला. नव्याने झालेल्या शहर उत्तरमध्ये काँग्रेसने विजय मिळवल्याने विश्‍वनाथ चाकोते आमदार झाले होते.

कालांतराने हा मतदारसंघ भाजपने काबिज केला आणि सलग पंधरा वर्षे विद्यमान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपचा हा गड राखला आहे. नुकत्याच मंगळवारी काँग्रेस भवन येथे झालेल्या शहर उत्तर मतदारसंघासंदर्भात झालेल्या बैठकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आपल्या ताब्यातील शहर उत्तर मतदारसंघ हा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आलाच पाहिजे. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना  आवाहन केले. 

काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, विश्‍वनाथ चाकोते, शहराध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर शिवदारे यांची टिमच शहर उत्तर ताब्यात घेण्यासाठी तैनात केली आहे. संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी काँग्रेसने केल्यामुळे पालकमंत्र्यांसमोरील आवाहन वाढले आहे. बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी तर शहर उत्तरमधून उमेदवारी मिळाल्यासारखेच काम सुरु केले आहे. चंदनशिवे यांच्याकडून सातत्याने पालकमंत्र्यांवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

हत्तीला भाजपच्या गटा-तटातूनही बळ दिले जात असल्याचीही चर्चा असते. कारण हत्तीचे पाय अनेकदा कासवाच्या दिशेने जातानाही दिसून आलेले आहेत. शिवसेना व भाजप युती न झाल्यास कमळाच्या विरोधात धनुष्यबाणही मैदानात असणार आहे. सेनेकडून महेश कोठे मैदानात असतील तर मात्र देशमुखांना चौथ्यांदा विजय मिळवणे तितकेसे सोपे असणार नसल्याचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडीत भाजपमधील पक्षांतर्गत वादाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण दोन देशमुखांमधील वाद सर्वश्रृत असल्याने दोघेही आपापल्या सावजावर लक्ष केंद्रीत करून एकाचा काटा काढण्याच्या प्रयत्न करण्याचीही शक्यता राजकीय कार्यकर्ते व्यक्‍त करतात. 

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक देशमुखांसाठी तितकीशी सोपी असणार नसल्याचे चित्र आहे.युती व आघाड्यांची घोषणा आणि त्यांचे उमेदवार कोण असणार यावरदेखील बर्‍याच राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. कारण मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्यामुळेदेखील काँग्रेसला फटका बसल्याची उदाहरणे आहेत.  काँग्रेसकडून शहर उत्तर मतदारसंघ मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु आहे. एमआयएमचे मतदारही या मतदारसंघात मोठ्या संख्येने असल्याने पतंगदेखील उत्तरच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुखांना सर्वच पक्षांवर दुर्बिण लावून बसावे लागणार आहे.