Thu, May 28, 2020 13:52होमपेज › Solapur › 'महाराष्ट्राला स्वच्छ व निर्मल करण्यासाठी वारकऱ्यांचे, लोककलाकारांचे योगदान मोलाचे'

'महाराष्ट्राला स्वच्छ व निर्मल करण्यासाठी वारकऱ्यांचे, लोककलाकारांचे योगदान मोलाचे'

Published On: Jul 12 2019 9:28AM | Last Updated: Jul 12 2019 9:28AM

संग्रहित छायाचित्रपंढरपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी व स्वच्छतेविषयी अध्यात्माच्या मदतीने प्रबोधन करून महाराष्ट्राला स्वच्छ व निर्मल करण्यासाठी वारकऱ्यांचे आणि लोककलाकारांचे योगदान मोलाचे असून यापुढील काळात शाश्वत स्वच्छतेमध्येही त्यांचे योगदान महत्वाचे असेल, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

पाणी पुरवठा व स्वच्छता व ग्रामविकास विभाग आयोजित श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडी दि.११ जुलै २०१९ रोजी पंचायत समिती पंढरपूर येथे समारोप कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीम. महाडिक, पाणी पुरवठा व स्वच्छता  विभागाचे उपसचिव अभय महाजन, जि.प.चे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, गजानन महाराज शास्त्री, बांधकाम व अर्थ समिती सभापती विजयराज डोंगरे, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक राहुल साकोरे, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती अरुण घोलप, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, कोल्हापूर, सातारा, जळगाव, या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आदीची उपस्थिती होती.

यावेळी स्वच्छता दिंडी पुस्तिकेचे प्रकाशन, स्वच्छ महोत्सव २०१९ अंतर्गत लोगोचे अनावरण, स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेच्या राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त सोलापूरसह,कोल्हापूर, सातारा, जळगाव या जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी स्वच्छता दिंडी मध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा माहितीपट तसेच सोलापूर जिल्हा परिषदेने तयार केलेला हँडवॉश स्वच्छता चित्र या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. पाणी पुरवठा विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध TV जाहिरातींचे प्रकाशन आणि प्रदर्शन करण्यात आले.

दिनांक 28 जून ते 11 जुलै 2019 या कालावधीमध्ये स्वच्छता दिंडींच्या माध्यमातून दोनही पालखी मार्गावरील गावामध्ये वारक-यांमध्ये शौचालय नियमित वापर, सांडपाणी, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, वृक्षलागवड, बेटी बचाव आदी बाबत कलापथकाच्या माध्यमातून जन जागृती करण्यात आली.

यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनशैली बदलण्यासाठी महाराष्ट्रातील साधुसंतांनी, वारकऱ्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळेच राज्य शौचालय बांधकामाची भरीव कामगिरी करता आली तसेच स्वच्छतेच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशामध्ये अव्वल स्थानी राहण्यास मदत झाली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन यांनी केले. महाराष्ट्र राज्याला अधिक स्वच्छ व निर्मळ करण्यासाठी कलावंत आणि वारकरी यांचं योगदान मिळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले. 

तसेच गजानन महाराज शास्त्री यांनी मनोगत व्यक्त करताना स्वच्छता दिंडी महाराष्ट्रातील अभिनव उपक्रम असून नागरिकांनीसुद्धा वैयक्तिक स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहण्याचं आवाहन नागरिकांना केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिंडी समन्वयक उद्धव फड यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वच्छ भारत मिशन कार्यालय आणि सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.