Mon, Jul 06, 2020 04:01होमपेज › Solapur › चिंचणी : वाळवंटीकरणाच्या वाटेवरचं ओअ‍ॅसिस

चिंचणी : वाळवंटीकरणाच्या वाटेवरचं ओअ‍ॅसिस

Published On: May 19 2019 1:35AM | Last Updated: May 18 2019 10:04PM
  पाण्याचे महत्व ओळखून 3 वर्षांपूर्वीच रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे. घरांवर पडणारे, परिसरात पडणारे पाणी जमीनीत मुरवण्याची यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे.

  या पाखरांसाठी ग्रामस्थांनी पाणवठे तयार केले आहेत, झाडांवर तांदूळ, गव्हाच्या प्लेटा लटकवल्या आहेत. पाखरांनी गाव सोडू नये म्हणून कोणत्याही कार्यक्रमासाठी फटाके फोडण्यावर निर्बंध घेतले आहेत.

  गावातील झाडांची संख्या पाहून पंढरपूरच्या फेसबुक फे्रंड्स फाऊंडेशनने येथे श्रमदान केले आणि झाडांना पाणी घातले तसेच 1 हजार लिटर्सची पाण्याची टाकी झाडांसाठी ग्रामस्थांना भेट दिलेली आहे.

पंढरपूर : नवनाथ पोरे

एका बाजूला संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळात होरपळून निघाला असताना  दुसर्‍या बाजूला पंढरपूर तालुक्यातील छोटंसं चिंचणी  पुनर्वसित गाव हिरव्या गर्द झाडीत थंडगार विसावा घेत आहे. सातारा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न परिसरातील चिंचणी गाव धरणात बुडवून विस्थापित झालेली 65 कुटुंबे याठिकाणी आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या निसर्गसंपन्नतेच्या आठवणी जागवत वृक्षरोपण आणि संवर्धनासाठी धडपडत आहेत.  या छोट्याशा गावाने 10 वर्षांपासून 4 हजार 500 झाडे  जीवापाड जपली आहेत.  सामाजिक संघटनांसह शासकीय व्यवस्थेलाही या गावाने वृक्षारोपण कसे करावे,  संवर्धन कसे करावे याचा धडा घालून दिला आहे.

सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाने हैराण करून सोडले आहे. दुष्काळाबरोबरच वृक्षतोड आणि वृक्ष संगोपनाचीही चर्चा सुरू झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातून विस्थापित होऊन आलेल्या  आणि पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे पुनर्स्थापित झालेल्या चिंचणी ग्रामस्थांनी  आपले निसर्गप्रेम दाखवून दिले आहे. जेमतेम 65 कुटुंबे असलेल्या या छोट्याशा गावाचे पुनर्वसन झाले ते निव्वळ खडकाळ, उंचवट्याच्या जागेत. मात्र, या खडकावरही चिंचणी ग्रामस्थांनी एकोपा, चिकाटी, जिद्द आणि संघर्ष करून वृक्षराजी फुलवली आहे. 

साडेतेरा एकर जागेत बसवलेले हे गावठाण असून त्यामध्ये 65 कुटुंबांची घरे, शाळा, मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, पाण्याची टाकी आहे. याव्यतिरिक्त उर्वरित जागेत चिंचणीकरांनी गेल्या 10 वर्षांपासून विविध प्रकारची झाडे लावून ती ट्री गार्ड शिवाय जगवून दाखवली. विशेषत: 2013, 2015 च्या दुष्काळात ग्रामस्थांनी पदरमोड करून ही झाडे टँकरच्या पाण्यावर जगवली. आज या गावाचे नंदनवन झाले असून गावात जिकडे -तिकडे हिरवळ पसरली आहे. 

झाडांमुळे संपूर्ण गाव झाकले गेले असून परिसरातील पक्षी या गावात विश्रांतीसाठी येऊन स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात निरव शांतता, थंडगार हिरवी सावली आणि पाखरांची किलबिल असे स्वर्गीय आनंद देणारे वातावरण निर्माण झालेले आहे. या पाखरांसाठी ग्रामस्थांनी पाणवठे तयार केले आहेत, झाडांवर तांदूळ, गव्हाच्या प्लेटा लटकवल्या आहेत. एवढेच  नाही तर पाखरांनी गाव सोडू नये म्हणून कोणत्याही कार्यक्रमासाठी फटाके फोडण्यावर निर्बंध घालून घेतले आहेत.  

त्यामुळे गाव झाडा, फुलांनी आणि पाखरांच्या किलबिलाटांनी बहरलेले आहे. या प्रसन्न वातावरणामुळेच बाहेर पडलेल्या भीषण दुष्काळाची पुसटसी सावलीही या गावावर  दिसत नाही. पाण्याअभावी या गावातील शेतकर्‍यांची पिके जळून गेलेली असली तरी झाडांनी दिलेल्या थंडगार सावलीमुळे या लोकांचे चेहरे  कोमेजले नाहीत. दुष्काळाशी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असल्याचे दिसून येते. 

 या गावामध्ये पाण्याचे महत्त्व ओळखून 3 वर्षांपूर्वीच रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे. घरांवर पडणारे, परिसरात पडणारे पाणी जमिनीत मुरवण्याची यंत्रणा गावात तयार करण्यात आलेली आहे. याकरिता रोटरी क्लबने चांगले सहकार्य केल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. वृक्षारोपणाची मोहीम दरवर्षी शासन राबवते, राजकीय नेते मंडळी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतात, मात्र त्यांचे संवर्धन केले जात नाही. त्यामुळे झाडांचे फक्त खड्डे शिल्लक राहतात. या पार्श्‍वभूमीवर चिंचणीकरांनी शासकीय,  सामाजिक, राजकीय व्यवस्थेला वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धनाचा वास्तूपाठच घालून दिल्याचे दिसून येते.

साडेतेरा एकर जागेत बसवलेले हे गावठाण असून गेल्या 10 वर्षांपासून विविध प्रकारची झाडे लावून ती ट्री गार्डशिवाय जगवून दाखवली. चिंचणी ग्रामस्थांनी आता आपले गाव कृषि पर्यटन म्हणून विकसित करण्याचा निर्धार केला असून त्यासंदर्भात ग्रामस्थांनी आराखडा तयार करून शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही या गावाच्या प्रेमात पडल्याने सर्व ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
मोहन अनपट, जिल्हाध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल