Mon, Sep 16, 2019 06:18होमपेज › Solapur › वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक 

वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक 

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 01 2018 11:43PMसोलापूर : प्रतिनिधी

एमबीबीएसला अ‍ॅडमिशन घेऊन देतो, असे सांगून शिक्षकाला 28 लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी मुंबईच्या दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप  जवाहर  शहा (वय 41, रा. फ्लॅट नं. 1, फुरडे  रेसिडेन्सी, विजापूर रोड, सोलापूर), अंबिका प्रसाद मिश्रा (रा. प्लॉट नं. 402, सुस्वागतम अपार्टमेंट, ओंकार टॉवरशेजारी, पठाणवाडी, मालाड पूर्व, मुंबई), कल्पना अनिल पगारे (रा. तळमजला, इंद्रप्रसाद बिल्डिंग, शिक्षक कॉलनी, कलानगर, बांद्रा  पूर्व, मुंबई), पांडे (रा. मुंबई), रवींद्र मोरये (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची  नावे आहेत. संदीप शहा यास न्यायदंडाधिकारी माहेश्‍वरी पटवारी यांनी 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याबाबत सीताराम विठ्ठल डोंगरे (वय 56, रा. घर नं. 4324, सोमराईनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सीताराम डोंगरे यांच्या मुलीला सन 2018 मध्ये संदीप शहा व इतरांनी एमबीबीएस, बीएएमएस, पोस्ट ग्रॅज्युएट इन मेडिसीन या विभागात चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात   व्यवस्थापन   कोट्यातून अ‍ॅडमिशन घेऊन देतो असे सांगितले. डोंगरे हे मराठा असून ते खुल्या प्रवर्गात येतोत. डोंगरे  यांना शहा व इतरांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता एमएचएसईटीचा फॉर्म डोंगरे हे खुल्या प्रवर्गातील असतानाही एसटी या प्रवर्गातून भरुन महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर चुकीची व खोटी माहिती भरली तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केंद्राच्या पूल व्यवस्थापन कोट्यातून अ‍ॅडमिशन करुन देतो असे खोटे सांगून बनावट अ‍ॅडमिशन फॉर्मस बनवून ते खरे असल्याचे सांगून डोंगरे यांच्याकडून ते फॉर्म भरुन घेतले.

सन 2015-16 व सन 2016-17 या शैक्षणिक कालावधीचे नुकसान करुन डोंगरे यांच्याकडून वेळोवेळी 28 लाख रुपये घेतले. शहा व इतरांचा खोटेपणा उघड झाल्यानंतर डोंगरे यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवी करुन दमदाटी केली म्हणून डोेंगरे यांनी याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करुन गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास करताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संदीप शहाला अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.