Tue, Sep 17, 2019 04:03होमपेज › Solapur › स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रा.पं. बांधकाम निधी बीडने खेचला

स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रा.पं. बांधकाम निधी बीडने खेचला

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 13 2018 11:26PMसोलापूर : संतोष आचलारे 

स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रा.पं. बांधणी योजनेतील राज्यातील सर्वाधिक निधी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघास देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील केवळ 2 ग्रा.पं.ना हा निधी मंजूर झाला असून बीड जिल्ह्यातील तब्बल 62 ग्रामपंचायतींना बांधकामासाठी प्रत्येकी 10 लाख 80 हजार रुपये निधी दिल्याने अन्य जिल्ह्यांवर राजकीय अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामविकास खात्याने 23 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार ठाकरे ग्रा.पं. बांधणी योजना सुरु केली. या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ना इमारत बांधकामासाठी 10 लाख 80 हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. ग्रा.पं.ने स्वनिधीतून 1 लाख 20 हजार रुपये अधिक खर्च करुन 12 लाखात ग्रा.पं. इमारत उभी करण्याची योजना होती. ना. मुंडे यांच्याकडून योजनेसाठी सर्व जिल्ह्यात समान निधी देणे गरजेचे असताना सर्वाधिक निधी केवळ बीडला देण्यात आला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अपेक्षित विधानसभा मतदारसंघातील बिटरगाव (श्री) व हिवरवाडी या दोन ग्रामपंचायतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. ना. विजयकुमार देशमुख, ना. सुभाष देशमुख यांच्या शिफारसी ग्रामविकास मंत्रालयात कचर्‍याच्या डब्यात गेल्या की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. राज्यभरातील अन्य जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतींची संख्या खालीलप्रमाणे आहे. 

पुणे : 25, सातारा : 3, सांगली : 4, कोल्हापूर : 17, औरंगाबाद : 11, नांदेड : 18, हिंगोली : 7, उस्मानाबाद : 4, जालना : 9, परभणी : 9, बुलढाणा : 16, यवतमाळ : 12, चंद्रपूर : 5, गडचिरोली : 3, नागपूर : 6, अकोला : 7, वाशिम : 3, अमरावती : 2, गोंदिया : 1, सिंधुदुर्ग : 1, रायगड : 12, पालघर : 1, लातूर : 5, बीड : 64, नाशिक : 13, धुळे : 3, जळगाव : 16, अहमदनगर : 20.

राज्यासाठी 36 कोटी, बीडला 7 कोटींचा निधी
राज्यातील 302 ग्रा.पं.च्या बांधकामासाठी ग्रामविकास खात्याने प्रत्येकी 12 लाखांप्रमाणे एकूण 36 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी बीड जिल्ह्यातील 62  ग्रा.पं. बांधकामासाठी 7 कोटी 44 लाख सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघातच राज्याचा सर्वात जास्त निधी नेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 152 ग्रामपंचायतींची यादी तयार करुन या ग्रा.पं.च्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती. यापैकी 2  ग्रा.पं.ना निधी मिळाल्याची प्रतिक्रिया जि.प. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.
 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex