Mon, Sep 16, 2019 12:06होमपेज › Solapur › उमेदवारी नसल्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांमध्ये नाराजी

उमेदवारी नसल्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांमध्ये नाराजी

Published On: Mar 30 2019 1:32AM | Last Updated: Mar 29 2019 11:21PM
पंढरपूर : प्रतिनिधी 

माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या मोहिते-पाटील समर्थकांतून उमेदवारी दिली नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी याकरिता खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रयत्न केले होते. त्यांना मिळणारी उमेदवारी खा. विजयदादांनी रणजितसिंह यांना द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केली होती. पक्षाने रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली नाही म्हणून मोहिते-पाटील समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर टीकेची झोड उठवली आणि पक्ष सोडण्याचा सल्ला रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिला. त्यानुसार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असे पक्षाला सांगितले होते. भारतीय जनता पक्षाकडे माढा लोकसभा मतदारसंघात दुसरा प्रबळ उमेदवार नाही त्यामुळे अखेरच्या क्षणी तरी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी मिळेल, अशी आशा मोहिते-पाटील समर्थकांना लागून राहिली होती. मात्र, शुक्रवारी भाजपने फलटणच्या रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील आहेत आणि त्या जिल्ह्यातून फक्त दोनच विधानसभा मतदारसंघ माढ्यामध्ये समाविष्ट आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातून 4 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची अपेक्षा भाजपने जिल्ह्यातील उमेदवार द्यावा, अशी होती. खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात चांगला संपर्क ठेवून विकासकामे केली होती. त्यामुळे त्यांची  किंवा  रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षासाठी फायद्याची ठरली असती. मोहिते-पाटील समर्थक मोठ्या त्वेषाने लढले असते आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केला असता. मात्र, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त समजताच मोहिते-पाटील समर्थकांमध्ये सन्नाटा पसरला आहे. अनेकांनी फोन करून एकमेकांकडे यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

केवळ सातारा जिल्ह्यातील उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील जनता स्वीकारणार का, अशी विचारणा करू लागले आहेत.रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी कार्यकर्त्यांना निराश करणारी ठरल्याचेही बोलले जात असून अनेकांनी दादांसाठी आपण काहीही केलं असतं मात्र आता काय करायचं, अशी विचारणा एकमेकांना करू लागले आहेत. राष्ट्रवादीचे मोहिते-पाटील समर्थक पदाधिकारी आता काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागले आहे.