Sat, Sep 21, 2019 06:03होमपेज › Solapur › कोर्टाचा निकाल विरोधात लागल्याने वकीलाला जीवे मारण्याची धमकी

कोर्टाचा निकाल विरोधात लागल्याने वकीलाला जीवे मारण्याची धमकी

Published On: Jun 13 2019 5:44PM | Last Updated: Jun 13 2019 6:11PM
मोहोळ : वार्ताहर

दिवाणी दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने प्रतिवादीच्या मुलाने वादीच्या वकिलास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १२ जून रोजी मोहोळ न्यायालयासमोर घडली. नामदेव तुकाराम खताळ (रा. बिटले ता. मोहोळ) असे धमकी देणाऱ्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी अॅड. अमोल व्यंकटेश देशपांडे यांनी १३ जुन रोजी मोहोळ पोलिसात तक्रार दिली.

याबाबत अॅड. अमोल देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोहोळ न्यायालयातील दिवाणी दावा क्रमांक १७८/०२ मध्ये अॅड. अमोल देशपांडे यांनी वादीच्या वतीने काम पाहिले होते. सदर दाव्याचा निकाल वादीच्या बाजूने लागल्याने न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे सदरचे प्रकरण वाटपाच्या प्रक्रियेसाठी मुलकी अधिकाऱ्याकडे रवाना करण्यात आले होते. सदर दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने प्रतिवादीचा मुलगा नामदेव तुकाराम खताळ (रा. बिटले ता. मोहोळ हा ॲडव्होकेट देशपांडे यांना सतत त्रास देत आहे) हुकूमनाम्याची अंमलबजावणी न थांबवल्यास त्याने १२ जून रोजी अॅड. देशपांडे यांना मोहोळ न्यायालयाच्या समोर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच तो कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती अॅड. देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर येथील अॅड. कांबळे यांच्या खून प्रकरणामुळे याही प्रकरणाकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने पाहून वेळीच नामदेव खताळ याच्यावर कारवाई करण्याची मागणी मोहोळ विधिज्ञ मंडळाने केली आहे. या प्रकरणी १३ जून रोजी मोहोळ पोलिसात नामदेव खताळ याच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी अॅड. श्रीखंडे, अॅड. एन.एम. क्षीरसागर, अॅड. हिंदूराव देशमुख, अॅड. अमोल देशपांडे, अॅड. कैलास खडके, अॅड. हाजीमलंग शेख, अॅड. जयंत कुलकर्णी यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे मोहोळ येथील वकिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून मोहोळ पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.