Sat, Jul 11, 2020 13:23होमपेज › Solapur › सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांना 21 वर्षे सक्‍तमजुरी

सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांना 21 वर्षे सक्‍तमजुरी

Published On: Mar 19 2019 1:26AM | Last Updated: Mar 18 2019 11:24PM
पंढरपूर : प्रतिनिधी

शहरातील भीमा ऊर्फ ढोबळ्या सुरेश शिंगाडे व अनिल मारुती पवार यांना सामूहिक बलात्कारप्रकरणी दोषी धरून दोघांनाही प्रत्येकी 21 वर्षे सक्‍तमजुरी व पाच हजार दंड अशी शिक्षा पंढरपूर येथील तिसरे अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एस. बावीस्कर यांनी सुनावली आहे. 

या प्रकरणी हकीकत अशी की, दिनांक 22 जुलै 2016 रोजी पीडित महिला घरात एकटी झोपली होती. तिचे पती व मुलगा दुसरीकडे नवीन घराच्या ठिकाणी झोपायला गेले होते. 

दि. 23 जुलै 2016 रोजी पहाटे एक वाजता दोन्ही आरोपींनी त्यांच्या घरात घुसून तिचेवर आळीपाळीने बलात्कार केला व पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्या नवर्‍यासह तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेने पतीस फोन करून घरी बोलावून सदरची घटना सांगितली. त्याप्रमाणे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली. 

सहायक पोलिस निरीक्षक घन:श्याम बल्लाळ व शरद कुलकर्णी यांनी आरोपीस अटक केली. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली. आरोपी अनिल पवारची तहसीलदार पंढरपूर यांच्यासमोर ओळख परेड करून त्याच्याविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले. 

सरकारपक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. त्यामध्ये फिर्यादी, फिर्यादीचा पती, फिर्यादीचा मुलगा तसेच साक्षीदार समाधान शिंगाडे, पंच सौरभ थिटे, नायब तहसीलदार सुरेश तिटकारे, पोलिस शिपाई केशव सुर्वे तसेच पोलिस उपनिरीक्षक राजाराम वाघमोडे व तपासी अधिकारी शरद कुलकर्णी व घनश्याम बल्लाळ यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी युक्‍तीवाद केला.

पंढरपूर येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.एस. बावीस्कर यांनी दोन्ही आरोपींना 21 वर्षांची सक्‍तमजुरी व पाच हजार दंड व भा. द. वि. सं. 452, 506, 34 करिता तीन वर्षे सक्‍तमजुरी व तीन हजार दंड व दंड न भरल्यास एक वर्ष करावास अशी शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी म्हणून पो. हे. कॉ. रावसाहेब वाघमारे पंढरपूर शहर पोलिस ठाणे तर्फे कार्यरत होते.