Sun, Aug 18, 2019 06:15होमपेज › Solapur › तिघा चोरट्यांकडून १२ मोटरसायकली जप्त

तिघा चोरट्यांकडून १२ मोटरसायकली जप्त

Published On: Feb 12 2019 4:24PM | Last Updated: Feb 12 2019 4:24PM
नातेपुते (साेलापूर) : प्रतिनिधी

नातेपुते पोलिस स्टेशन येथे तीन चोरांना अटक करून त्यांच्याकडून बारा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या सर्वत्र  मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नातेपुते पोलीस स्टेशन व अकलूज उपविभागीय पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी संयुक्त कारवाई करत गोपनीय सूत्रांच्या आधारावर स्थानिक गुन्हे शोध पथकाने तीन मोटरसायकल चोरांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे 12 मोटारसायकली असल्याचे आढळून आले. 

हरी तानाजी शिरतोडे( रा.फोंडशिरस), अक्षय संजय बोडरे (रा. फोंडशिरस), महादेव उर्फ सोनू अशोक चव्हाण (रा.घुमेरा (वेळापूर) अशी त्यांची नावे आहेत. यातील काही मोटारसायकली कमी किमतीत विकण्यात आल्या होत्या.

नातेपुते पोलिस स्टेशन हद्द व माळशिरस तालुक्यात मोटारसायकल चोरीचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व सहाय्यक फौजदार राजाराम शिंदे आणि कॉस्टेबल अस्लम काझी यांनी आरोपींची माहिती काढण्यासाठी गोपनीय यंत्रणा सतर्क करून ३ संशयीत ईसम निष्पन्न केले. 

पोलिसांनी या तीघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबूली दिली असून चोरीच्या १२ गाड्या त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. जप्त गाड्यांमध्ये ५ बुलेट, २ शाईन, १ यूनिकॉर्न, एच एफ डिलक्स अशा गाड्यांचा समावेश असून एकूण किंमत रु.१२ लाख आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी भुजबळ, पोसई सुशांत किनगे यांच्यासह पोलिसांनी केली.