Mon, Jul 22, 2019 13:56होमपेज › Satara › ..तर माढ्यातून लोकसभा लढवू : सुभाष देशमुख

..तर माढ्यातून लोकसभा लढवू : सुभाष देशमुख

Published On: Sep 15 2018 12:09AM | Last Updated: Sep 15 2018 8:16AMफलटण : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवायला सांगितली तर पूर्ण ताकदीनिशी आपण ही निवडणूक लढू, असे राज्याचे सहकार व पणनमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी फलटण येथे पत्रकारांशी बोलताना सांगीतले. 

साताराहून सोलापूरकडे जात असताना फलटणमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ना.देशमुख पुढे म्हणाले, राजकारणात आल्यापासून मी तुळजापूर येथून तर  सोलापूर दक्षिणमधून तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह माढ्यातून शरद पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवून कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास आगामी लोकसभा निवडणूक आपण माढ्यातून लढवू. 

सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने भाजपा सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आले असल्याचा आरोप विरोधक करत असतात यावर विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना ना.देशमुख म्हणाले, मी सहकार मंत्री झाल्यापासून एकाही कारखान्याची विक्री झाली नाही तर पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने सहकारी कारखाने अडचणीत आणून त्यांनीच ते विकत घेतले. सद्यस्थितीत जे कारखाने अडचणीत आले आहेत त्या कारखानदारांनी कारखान्यावर भरमसाठ कर्जे घेवून  स्वत: अडचणीत न येता कारखाने अडचणीत आणले आहेत. याची अनेक उदाहरणे सातारा व सोलापूर जिल्ह्यात आहेत, असेही त्यांनी सांगीतले. फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर वर्क्सने शेतकर्‍यांचे 51 कोटी रुपये थकवले याबाबत विचारले असता ना. देशमुख अवाक झाले.  त्यांनी तात्काळ साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. या कारखान्याने भरमसाठ कर्जे घेतल्यामुळे ही स्थिती ओढवली असल्याचे ना.देशमुख यांनी स्पष्ट केले.