Mon, Jun 17, 2019 10:30होमपेज › Satara › सातारा पोलिसांकडून तक्रार निवारण दिनाचे आयोजन

सातारा पोलिसांकडून तक्रार निवारण दिनाचे आयोजन

Published On: Oct 12 2018 8:31PM | Last Updated: Oct 12 2018 8:32PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये आज (शनिवारी) दिवसभर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे ज्या नागरिकांच्या तक्रारी, गुन्हे, अर्ज चौकशी, नागरी सुविधा याबाबत जे प्रलंबित (पेंडीग) विषय आहेत त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, तक्रार निवारण दिनाचा हा स्तुत्य उपक्रम असून पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचीही आता ‘झिरो पेंडसी’कडे वाटचाल सुरु असल्याचे स्पष्ट आहे.

सातारकरांसाठी शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी ठाणे कार्यरत आहे. या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेसह, आंदोलन, मोर्चे होत असतात. तसेच चारित्र पडताळणीसह विविध दाखल्यांची नागरिकांना गरज भासत असल्याने ते पोलिसांकडून घेतले जातात. पोलिसांची अपुरी संख्या व गुन्ह्यांचा  तपास करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी असल्याने अनेकदा अशी प्रकरणे प्रलंबित राहतात. यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्यासही अडथळे येतात. यातून पोलिस व नागरिकांमध्ये सुसंवाद राहत नाही.

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ज्या पोलिस ठाण्यांमध्ये प्रलंबित गुन्हे आहेत त्यांनी तत्काळ त्याची निर्गती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शविनार दि. १३ रोजी सातारा शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्याअंतर्गत ज्या नागरिकांचे विषय प्रलंबित आहेत त्यांनी कागदपत्रांसह किंवा विना कागदपत्रांसह उपस्थित रहावे. तक्रार निवारण दिनाचे औचित्य साधून शहर पोलिस ठाण्यासमोर मंडप बांधण्यात आला आहे. तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या हॉलमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधितांनी याची नोंद घेवून उपस्थित राहण्याचे आवाहन पोनि नारायण सारंगकर व पोनि किशोर धुमाळ यांनी केले आहे.

तक्रारदारांनो लाभ घ्या..

सातारा जिल्ह्याने महसूल विभागाच्या माध्यमातून झिरो पेंडन्सी पाहिली आहे. महसूलच्या पावलावर पाउल टाकत आता सातारा पोलिस दलही सरसावले आहे. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची, तक्रारीची निर्गती हा अजेंडा समोर ठेवून प्रथमच सातारा शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाणे सामोरे जात आहे. यामुळे पोलिस ठाण्याच्या संदर्भात ज्या नागरिकांची प्रकरणे प्रलंबित आहेत त्या सर्वांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रलंबित गुन्हा व तक्रारीच्या अनुषंगाने तेथे निकाली काढण्याचे व तसेच योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे.