Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Satara › पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते : राणे (व्हिडिओ)

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते : राणे (व्हिडिओ)

Published On: Dec 09 2017 7:41PM | Last Updated: Dec 09 2017 9:17PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला मिळू नये. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमताच नव्हती. तसेच राज्यातील प्रश्‍नांचीही त्यांना जाण नव्हती. मीच मंत्रिमंडळ आणि अधिवेशनात सहा महिने त्यांच्यासाठी उपस्थित होणार्‍या प्रश्‍नांना उत्तरे दिली होती. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पदासाठी लायक नव्हते, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

कराडमधील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. माजी खा. नीलेश राणे, सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नारायण राणे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना ते मुख्यमंत्री झाल्यावर पहिले सहा महिने ते मंत्रिमंडळ बैठकीत नुसते बसूनच रहात. राष्ट्रवादीने एखाद्या मुद्द्यावरून टीका केल्यास मी स्वत: त्याला सामोरे जात होतो. अधिवेशनातही असेच चित्र होते, असे सांगत त्यामुळेच मी पृथ्वीराज चव्हाण यांचा लाडका आहे, असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला. तसेच विधानपरिषदेची उमेदवारी मिळू नये, म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी व्हावी, म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांच्या आपणास नेहमीच शुभेच्छा असतात, असे उपरोधिक वक्‍तव्यही एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी व्यक्त केले.

याशिवाय उद्धव ठाकरे हे मी बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला असे आज सांगत आहेत. मात्र, मातोश्री बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याइतका त्रास दुसरा कोणीच दिला नाही. उद्धव ठाकरे यांनी आता जास्त बोलू नये, अन्यथा मी उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला त्रास जाहीरपणे जनतेसमोर मांडणार असल्याचा सज्जड इशाराही राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. 

बांद्रा पोटनिवडणुकीवेळी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेते त्यावेळी माझ्याकडे आले होते. त्यांनीच मला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला. मात्र नंतर तेच माझ्या पराभवासाठी प्रयत्न करत होते, असे सांगत नांदेडमध्ये एमआयएम त्यांच्याशी जुळवून घेते. मात्र, बांद्रा निवडणुकीत माझ्याविरूद्ध उमेदवार देतात, याचा अर्थ काय? असा प्रश्‍नही नारायण राणे यांनी उपस्थित केला.