Wed, Jun 03, 2020 23:32होमपेज › Satara › सालपेतील वृद्धेचा खून चोरीतूनच

सालपेतील वृद्धेचा खून चोरीतूनच

Published On: Dec 17 2018 1:38AM | Last Updated: Dec 17 2018 1:38AM
सातारा : प्रतिनिधी

सालपे, ता. फलटण येथे शांताबाई जयवंत खरात (वय 70) या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर दीड महिन्यानंतर वाचा फुटली. चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असल्याचे समोर आले आहेे. याप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने रोहित ऊर्फ तक्या चिवळ्या पवार (वय 19, रा. वाळवा, सांगली, सध्या रा. चौधरवाडी, ता. फलटण) याला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 29 ऑक्टोबर 2018 रोजी शांताबाई खरात या महिलेचा धारदार शस्त्राने खून झाला होता. पहाटे त्या लघुशंकेसाठी बाहेर आल्यानंतर खुनाची घटना घडली होती. कुटुंबियांना वृध्द शांताबाई रक्‍ताच्या थारोळ्यात दिसल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्‍लेखोरांनी खरात यांच्या पाठीवर वार करुन गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरुन नेला होता. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तपासाला सुरुवात केली मात्र त्यात त्यांना सुरुवातीला यश आले नाही. यामुळे शांताबाई खरात यांचे मारेकरी कोण? ते कितीजण होते? कोणत्या कारणासाठी खून झाला? याबाबत गूढ निर्माण झाले होते.

दोन दिवसांपूर्वी सातारा एलसीबीचे पोनि विजय कुंभार यांना या घटनेबाबत माहिती मिळाली. संशयित सांगली जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधला. संशयित तक्या पवार याला सांगली पोलिसांनी ताब्यात घेवून सातारा एलसीबीला दिल्यानंतर त्याच्याकडे रविवारी चौकशीला सुरुवात केली. चौकशीमध्ये तक्या पवार याने बहुतेक गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. संशयिताने सालपे घाटात चोरीच्या उद्देशाने फिरत असताना वृध्द महिलेचा खून केला असल्याची कबुली दिली. याशिवाय त्याच दिवशी मोर्वे ता. खंडाळा येथेही घरफोड्या केल्याची कबुली दिली. या कृत्यामध्ये त्याच्यासोबत आणखी चार साथीदार  असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

संशयित तक्या पवार याच्याकडे प्राथमिक चौकशी झाल्यानंतर सातारा एलसीबीने त्याला लोणंद पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, सपोनि गिरीष दिघावकर, पोलिस हवालदार घोरपडे, नवघणे, माने, मुलाणी, बेबले, गोगावले, फडतरे, कारंडे, काटकर, सावंत, जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.