Sun, Aug 18, 2019 06:39होमपेज › Satara › जेव्हा उदयनराजे म्‍हणतात, हमें तुमसे प्यार कितना (Video) 

जेव्हा उदयनराजे म्‍हणतात, हमें तुमसे प्यार कितना (Video) 

Published On: Feb 12 2019 3:29PM | Last Updated: Feb 12 2019 3:52PM
सातारा : प्रतिनिधी  

सातार्‍याचे लोकप्रिय खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू राज्यासह देशाने पाहिले आहेत. मंगळवारी सकाळी सातार्‍यातील शाहू कलामंदिरात पार पडलेल्या पत्रकार सोहळ्यात खा. उदयनराजेंनी एका हिंदी चित्रपटातील  किशोर कुमार यांचं ‘‘हमें तुमसे प्यार कितना...’’ हे गीत पेश केलं. त्यांच्या या अदाकारीला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्‌ट्यांनी मनमुरादपणे दाद दिली.

सातारा नगरपालिका तसेच जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार सोहळ्यासाठी राजमाता छ. कल्पनाराजे भोसले, खा. छ. उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. डी. व्ही. पाटील, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, मुख्याधिकारी शंकर गोरे,  सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव प्रमुख उपस्थित होते.

खा. उदयराजे म्हणाले,  आपल्या सर्वांना बघून डोळ्यांचं पारणं फिटलं. कारण नसताना माझं कौतुक झालं असलं तरी मला दृष्ट लागणार नाही. मोठ्या घरात जन्माला आला म्हणून माणसाला मोठपणा प्राप्त होत नाही. माणूस खर्‍या अर्थाने कर्तृत्वाने मोठा होतो. जिद्द ठेवून उद्दिष्टाने वाटचाल केल्याने आज अनेकांना पुरस्कार मिळाले. मी सर्वसामान्यांसाठी सर्व अर्पण करणार असून हेच माझं उद्दिष्ट आहे. श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमच्यासाठीच जगणार आहे. तुमच्यावर अपार प्रेम करणार आहे. तुमच्यावर शब्दातीत प्रेम आहे हे शपथेवर सांगतो. माझ्यात कसलाही बदल होणार नाही. फक्त तुम्ही तुमच्यात बदल करु नका. काय कमवायचं आणि काय गमवायचं? आयुष्यातील बरीच वर्षे निघून गेली. हाफ चड्डीतले दिवस निघून गेले. कॉलेजला असताना दांड्या मारायचो पण कमवली ती मैत्री होती. डीव्ही दादा ग्रेट असून त्यांचे कार्य आदर्शवत आहे. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा आज सन्मान होत आहे. अवलियापण असल्याशिवाय खर्‍या अर्थाने मजा येत नाही. आतापर्यंत अनेकांची भाषणे झाली. कुणी हे.. कुणी.. ते सांगितले, असे म्हणत खा. उदयनराजे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये गाणं पेश केलं.  ‘‘हमें तुमसें प्यार कितना, ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना..कोई तुमसेऽऽ...’’ या गीताला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्‌ट्यांनी दाद दिली. तुम्ही आला म्हणून बंर.. नाहीतर दाखवलंच असतं,  असा प्रेमळ दमही त्यांनी भरला.