Mon, Jul 13, 2020 11:40होमपेज › Satara › ‘जे बाबा’ टोळीवर ‘मोका’अंतर्गत दणका

‘जे बाबा’ टोळीवर ‘मोका’अंतर्गत दणका

Last Updated: Oct 10 2019 12:06AM
कराड : प्रतिनिधी
पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयित जुनेद शेख व त्याच्या ‘जे बाबा’ टोळीवर पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीमध्ये 21 संशयितांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा पोलिसप्रमुख तेजस्वी सातपुते यांनी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून गुंडांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांसह, गुन्हेगार व गुंडांमध्ये पोलिसांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केलेल्या टोळीमध्ये जुनेद फारुक शेख (वय 30, रा. शिवाजीनगर, मलकापूर-कराड), समीर इस्माईल मुजावर (वय 30, रा. सर्वोदय कॉलनी, आगाशिवनगर मलकापूर-कराड), शिवराज सुरेश इंगवले (24, रा. लाहोटीनगर, मलकापूर-कराड), अल्ताफ राजेखान पठाण (50, मंगळवार पेठ, कराड), निहाल अल्ताफ पठाण (24, मंगळवार पेठ, कराड), मजहर बद्रुद्दीन पिरजादे (28, अहिल्यानगर बिरोबा मंदिराच्या पाठीमागे, मलकापूर-कराड), हैदर महिबुब मुल्ला (26, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कराड), पितांबर ऊर्फ पप्पू विश्‍वास काटे (26, रा. बैलबाजार रोड, गणपती मंदिराजवळ, मलकापूर-कराड), सिकंदर बाबू शेख (29, रा. विंग, ता. कराड), प्रमोद ऊर्फ आप्पा तुकाराम जाधव (37, पंचमुखी निवास, साईनगर, कराड), निरज आनंदराव पानके (26, शिवराज कॉलनी, कोयना वसाहत कराड), अक्षय उर्फ महादेव संजय मोकाशी (वय 25,  रा. बागलवस्ती आगाशिवनगर, मलकापूर कराड), दिवाकर उर्फ गोंड्या बापूराव गाडे (27, साईनगर मलकापूर, कराड), विजय बिरू पुजारी (20, यशवंतनगर बैलबाजार रोड, मलकापूर, कराड), सोहेल राजूभाई मुलाणी (28, रा. ज्ञानदीप कॉलनी, एमजेएमनगर मलकापूर, कराड), आकिब लियाकत पठाण (रा. मलकापूर, ता. कराड), अक्षय साहेबराव धुमाळ (मलकापूर, ता. कराड), सॅम उर्फ समीर नुरमंहमद मोमीन (रा. मुजावर कॉलनी, कराड), अल्फाद कासीम शेख (रा. मलकापूर, ता. कराड), आयुब बेली (रा. मलकापूर, ता. कराड) यांच्यासह एक अल्वयीन अशी मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 

यापैकी जुनेद शेखसह 15 संशयितांना पोलिसांनी या पूर्वीच अटक केली आहे. तर मोक्‍का कारवाई करण्यात आलेल्या टोळीतील सहाजण अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. फरार असलेल्यांमध्ये आकीब पठाण, अक्षय धुमाळ, समीर मोमीन, अल्फाद शेख व आयुब बेली या पाचजणांचा समावेश आहे. 

कराड शहर हे संवेदनशील म्हणून ओळखले जाते. कराड शहर व उपविभागात अनेक गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत. या गुन्हेगारी टोळ्यामध्ये अनेकवेळा वर्चस्ववादातून मारामारी, खून, गोळीबार अशा घटना घडत असतात. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत असून अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. याचा विचार करून पोलिसांनी कराड व परिसरातील गुंडगिरी संपविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पवन सोळवंडे खूनप्रकरणातील संशयित जुनेद शेख व त्याच्या टोळीवर मोक्‍कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय आणखी दोन टोळ्या पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांच्यावरही मोक्‍कांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मोक्‍कांतर्गत कारवाई केलेल्या जुनेद शेखच्या टोळीमध्ये 21जणांचा समावेश आहे. या कारवाईमुळे कराड व परिसरातील गुन्हेगार, अवैध व्यवसायिक व गुंडामध्ये पोलिसांची  दहशत निर्माण झाली आहे. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे निवडणुकीतील गुंडाच्या वावरावर नियंत्रण येणार आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्कालिन डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी या टोळीला मोक्‍का लावण्यासाठी प्रयत्न केले. डीवायएसपी सुरज गुरव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर याचा पाठपुरावा केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कराड व परिसरातील सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्‍त केले जात आहे.