Sat, Jul 04, 2020 20:24होमपेज › Satara › विवाहाच्या नावाखाली इथं घातला जातोय गंडा

विवाहाच्या नावाखाली इथं घातला जातोय गंडा

Last Updated: Nov 09 2019 2:05AM
सातारा : मीना शिंदे

बदलत्या काळाच्या ओघात विवाह जमवण्यासाठी अनेकांचा विवाह संस्थांकडे ओढा वाढला आहे. त्याचप्रमाणे विवाह संस्थांची संख्याही वाढली आहे. आपले विवाह जमवण्यासाठी इच्छुक वधू-वरांसह परितक्ता, विधवा, विधूर यांचीही नोंदणी विवाह संस्थेकडे असते. मात्र उच्चभ्रू स्थळे व चांगली मालमत्ता असलेल्या विधवा स्थळांसाठीच काही महाभाग आग्रही असल्याचे समोर आले आहे. या स्थळांच्या माध्यमातून विवाहाच्या नावाखाली त्यांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून त्यांना गंडा घातला जात आहे.

पूर्वी सामाजिक कार्य म्हणून लग्न जुळवली जात होती. आता धकाधकीच्या युगात सामाजिक बांधिलकी लोप पावत चालली आहे. त्यामुळे विवाह इच्छुक मुलामुलींच्या पालकांना आपल्या पाल्यांचे विवाह जमविताना अडचणी येत आहेत. बहुसंख्य कुटुंबे आपल्या पाल्यांचे विवाह जमवण्यासाठी वधू-वर सूचक केंंद्रांचा आधार घेत आहेत. त्यामुळे या विवाह संस्थांचा व्यवसाय फोफावला आहे. या विवाह संस्थांची नियमावली ठरलेली असते. विवाह संस्थांना व्यावसायिक स्वरुप आल्यामुळे नाव नोंदणीसाठी वेगवेगळी फी आकारुन त्यानुसार नोंदणीकृत वधू-वरांना स्थळे दाखवण्याची सेवा देत असतात. काही वधू-वर सूचक केंद्रे याला अपवाद आहेत. केवळ एक सामाजिक कार्य म्हणून विना मोबदला लग्न जुळवण्याचे काम काही केंद्रे करतात. तर अपप्रवृत्तींकडून उच्चभ्रू स्थळे बघूनच गंडा घातला जात आहे. काही महाभागांकडून एकाच वेळी वेगवेगळ्या विवाह  संस्थांमध्ये विवाह नोंदणी केली जात आहे. यामध्ये उच्चभ्रू, भरपूर मालमत्ता असलेल्या स्थळांची शोधाशोध केली जात आहे.  यामध्ये बहुतांश विधवा, परितक्ता महिला अथवा पुरुषांना प्राधान्य देत सहानुभूतीच्या नावाखाली मालमत्तेवर डोळा ठेवून लग्नाला संमती दर्शविली जात आहे.

विवाह संस्थेच्या प्रक्रियेनुसार लग्न जमविले जाते. लग्नानंतर काहीच महिन्यांमध्ये संबंधित महिलेची मालमत्ता स्वत:च्या नावावर करुन घेतली जाते. त्यानंतर अशा स्त्रीला मानसिक व शारीरिक छळ सुरु केला जातो. विधवा विवाहाला अजूनही म्हणावीशी समाजमान्यता मिळत नसल्याने स्त्रीयांना त्रासाला सामोरे जावे लागले. याचाच गैरफायदा घेत तिला एकटे पाडून तिची संपत्ती लाटली जात आहे, अशा फसवणुकीच्या प्रकारात पुरुषांबरोबर महिलाही आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.              

फसवणुकीच्या प्रकरणातील बहुतांश महिला व पुरुष हे परजिल्ह्यातील असल्याने कायदेशीर कारवाई करण्यासही अनेक अडथळे येतात. तसेच शासकीय कामाच्या कार्यपध्दतीमुळे वारंवार न्यायालयीन बाबतीत हजर राहणे वेळखाऊ व खर्चीक ठरते. तर काही प्रकरणात सामाजिक प्रतिष्ठेचा विचार केला जात असल्याने अशा प्रकरणाला बगल दिली जात असल्याने याचा गैरफायदा  अपप्रवृत्ती घेत आहेत. या सर्व प्रकारात विवाह संस्थेला अंधारात ठेवले जाते. लग्न जुळेपर्यंतच विवाह संस्थांच्या संपर्कात राहतात. एकदा का लग्न जुळले की विवाह संस्थांचे फोन घेणे, त्यांना भेटने टाळून संपर्कच तोडला जात आहे. या सर्व प्रकाराबाबत विवाह संस्था अनभिज्ञच राहत आहेत. विवाहाच्या नावाखाली गंडा घालणार्‍या ठगांना कायद्याचा चाप लावणे आवश्यक आहे.

दुसर्‍यांदा बोहल्यावर चढणार्‍या टोळ्या कार्यरत 
समाजात दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्यासाठी तयार असलेल्या वधू तसेच वरांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्या परजिल्ह्यातील व दूरच्या ठिकाणावरील सावज हेरतात. त्यामुळे लग्नानंतर पळून गेल्यास माग काढणे कठीण होत आहे. त्यातच सापडले तरी कायदेशीर कारवाईसाठी माराव्या लागणार्‍या हेलपाट्यांमुळे फसगत झालेल्या नागरिकांना नाहक त्रास सहना करावा लागतो.
आजही पुरुषप्रधान संस्कृतीचाच पगडा...

समाजात महिलांच्या विधवा विवाहास मान्यता मिळत असली तरी आजही पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा कायम आहे. विधवा किंवा परिक्ता  महिलेशी लग्नाला तयार होणारे पुरुष तिच्या अपत्यांचा स्वीकार करण्यास तयार नसतात. त्यामुळे त्यांच्याकडून विधवा किंवा परितक्ता स्त्रीला आधार देण्याची उदात्त हेतू असल्याचा केवळ दिखावा केला जातो.