होमपेज › Satara › विसावा नाका बनलाय ‘क्राईम झोन’

विसावा नाका बनलाय ‘क्राईम झोन’

Published On: Dec 26 2018 1:17AM | Last Updated: Dec 25 2018 7:32PM
खेड : अजय कदम 

सातारा-कोरेगाव मार्गावरील विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, जिल्हा परिषद चौक हा भाग सध्या क्रिमिनल झोन म्हणून उदयास आला असल्यामुळे येथील पोलिस चौकीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या परिसरात दिवसेंदिवस वाढणार्‍या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शांतता व सुरक्षितता धोक्यात आली असून राडेबाजी आता अंगवळणीच पडली आहे. 

एकेकाळी सातारा शहराचा ‘डेक्कन जिमखाना’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या विसावा पार्क, कल्याणी बॅरेक्स, यशवंत कॉलनी, देवी कॉलनी, गोरखपूर, पिरवाडी या भागात सद्या शांतता, सुरक्षिततेला गालबोट लागले आहे. विसावा नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा भाग गुन्हेगारीचा केंद्रबिंदू बनू लागला आहे. महाविद्यालयीन युवकांच्या राडेबाजीबरोबर, लूटमार, अपहरण, हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय  या घटनांमुळे येथील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या भागात असलेल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या टोळक्यांमुळे विसावा नाका हादरला असून रस्त्यावर होणारी टोळक्यांची खुलेआम दादागिरी, मारामारी नागरिक उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. एखादी गुन्हेगारी स्वरुपाची घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळावर येतात, पाहणी करतात व जातात परंतु या भागात पोलिसांची काममस्वरुपी गस्त नसल्याने गुन्हेगारांना मोकळेच वातावरण मिळत असल्याचे चित्र आहे. महिला व युवतींना सायंकाळी रस्त्यावरुन फिरणेदेखील धोक्याचे झाले असून टपर्‍यांसमोर उभ्या राहणार्‍या टोळक्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वायसी कॉलेजजवळ पोलिसांचा ठिय्या असला तरी विसाव्यानाक्यावर कायमस्वरुपी पोलिस चौकीची मागणी होत आहे.

या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेकामी एमआयडीसी अथवा गोडोली पोलिस चौकीतील पोलिसांकडे दाद मागावी लागते. परंतु या चौक्या असून अडचण नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत. तर पोलिसांच्या गाड्या फिरत असल्यातरी गाड्या पुढे गेल्यानंतर पाठीमागून राडेबाजी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे भय संपत नसून विसावा नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात कायमस्वरुपी पोलिस चौकी उभारण्याची मागणी होत आहे. 

महाविद्यालयीन परिसर केंद्रबिंदू; बाहेरील टोळक्याचा मोठा वावर... 

विसावा नाका परिसर क्राईम झोन म्हणून नव्याने उदयास आला आहे. येथील स्थानिक जनता शांत, संयमी व सुशिक्षित आहे. मात्र, या सोशिकतेचा अंत पाहिला जात आहे. गुन्हेगारी घटना वाढत असून लगतच्या महाविद्यालयाचा परिसर या घटनांचे मूळ बनला आहे. या परिसरात विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरील टोळक्याचा मोठ्या प्रमाणात वावर असून त्यांच्यामुळे येथील शांतता धोक्यात आली आहे. दररोज होणार्‍या राडेबाजीमुळे महिला व युवतींचा या परिसरातील वावर कमी होवू लागला आहे. त्यामुळे विसावा नाक्यावर पोलिस चौकी होण्याची गरज निर्माण झाली आहे. येथे पोलिस चौकी झाल्यास सायन्स कॉलेजपासून डीजी कॉलेज, शिवाजी कॉलेज, कल्याणी शाळा ते बॉम्बे रेस्टॉरंट व पुढे माहुलीपर्यंतचा परिसर नियंत्रणात राहू शकतो. एमआयडीसीतील पोलिस चौकीचा विसावा नाका परिसरात शांतता व सुव्यवस्थेसाठी काडीचाही उपयोग होत नाही. विसावा नाका परिसरात नागरी वस्ती वाढत असल्याने येथेच नव्याने पोलिस चौकी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.