Sun, Jun 07, 2020 05:54होमपेज › Satara › सातार्‍यात पावसाचे तांडव

सातार्‍यात पावसाचे तांडव

Last Updated: Jun 01 2020 12:11AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसाने थैमान घातले. धुळीचे प्रचंड लोट, सोसाट्याचा वारा, भले मोठे टपोरे थेंब घेऊन आलेल्या मुसळधार पावसाने काही क्षणातच सर्वत्र दाणादाण उडवली. पालापाचोळा घेऊन घोंघावणार्‍या वादळाची जनजीवनावर अक्षरश: दहशत निर्माण झाली. अनेक ठिकाणी नुकसान केले. वादळ व पावसाच्या तांडवामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती परिसर, कृष्णानगर परिसरात महाकाय वृक्ष कोसळले. काही ठिकाणी घरांवरचे छप्पर उडून गेल्याचे प्रकारही घडले. 

रविवारी  सकाळपासूनच उन्हाचा तडाखा लागत असल्याने अंगाची लाही लाही झाली होती. तसेच, अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. या संमिश्र वातावरणामुळे नागरिक हवालदिल झाले होते. दुपारच्या सुमारास ढग दाटून आले. काही काळानंतर सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने जोरदार सुरूवात केली. सातारा शहर व परिसरात वादळी वार्‍यासह अर्धा तास पावसाने थैमान घातले. सोसाट्याच्या वार्‍यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवार व झेडपी मुख्य रस्त्यालगत, गोडोली, सदरबझार, कृष्णानगर या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले. हे वृक्ष विद्युत पोलवर पडल्याने खांब वाकले होते. अनेक ठिकाणी घरांचे छप्परच उडून गेल्याने संसार उघडे पडले. 

सातारा शहरात जोरदार वार्‍यामुळे वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागली. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेतील व्यापार्‍यांसह नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसात व्यापार्‍यांचा दुकानाबाहेर ठेवलेला मालही भिजला. उन्मळून पडलेले वृक्ष वीज वाहक तारांवर पडल्याने शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. 

कोरेगाव तालुक्यात रविवारी वळीव पावसाने थैमान घातले असून रहिमतपूर, बोरगाव, सुर्ली, टकले, चोरगेवाडी परिसरात वीज व वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने अतोनात नुकसान केले असून रहिमतपूर, सुर्ली परिसरात विजेचे 42 पोल पडले. सुर्ली येथे भलेमोठे झाड अंगावर पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. अनेकांच्या घरावरील व गोठ्यावरील छत उडून लाखो रुपयांची हानी झाली. तीन दुचाकीसह एका ट्रक्टरचेही नुकसान झाले. तसेच रहिमतपूर ते कराड मार्गावर बोरगाव ते टकले हद्दीत झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली.

रहिमतपूर येथील आदर्श शाळेच्या इमारतीत कोरोना विलगीकरण कक्ष असून या ज्युनियर कॉलेजच्या इमारतीवरील छत उडून गेले. केवळ दैव बलवत्तर म्हणून  पुणे, मुंबईवरुन आलेल्या विलगीकरण कक्षातील 11 लोकांची जिवीतहानी टळली.

कृष्णानगरमध्ये वीज खांब पडले 
 खेड : रविवारी झालेल्या पावसामुळे कृष्णानगर येथील वाई अर्बन बँकेच्या नजिक मारुती मंदिर, वीटभट्टी परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले महावितरणचे आठ विद्युत खांब कोसळले. तर महावितरणच्या पोल फॅक्टरीच्या आवारातील झाड रस्त्यावर पडल्याने सातारा कोरेगाव मार्गावरील कृष्णानगर ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. विद्युत खांब कोसळल्याने सातारा कोरेगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या कृष्णानगर, संगमनगर, विकासनगर, वनवासवाडी, संगम माहुली व त्या अंतर्गत असलेल्या लोकवस्तीमधील  विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. याचबरोबर कृष्णानगर जि.प. शाळेच्या आवात झाड पडल्याने शाळेचा पत्रा दुभंगला. कृष्णानगरसह प्रातपसिंहनगर मार्गावरील निलगिरीची झाडे उन्मळून पडली. 

सोयाबीन भिजल्याने नुकसान
वेणेगाव : सातारा तालुक्यातील खोजेवाडीसह परिसरात रविवारी दुपारी अवकाळी पावसाने नुकसान केले. अतीत (ता. सातारा) येथील रवींद्र  सावेकर यांच्या गोडावूनचा पत्रा लोखंडी अँगलसह उचकटून पडला. यात सोयाबीन भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर दुसर्‍या घटनेत खोजेवाडी येथील महाराष्ट्र हायस्कूलचा तीन खोल्यांचा  पत्रा अँगलसह उचकटून पडला.  मात्र या पावसाने एकीकडे नुकसान तर दुसरीकडे  खरीप पूर्व मशागतीसाठी चांगलाच फायदा होणार आहे. तुकाईवाडीसह कोपर्डे, वेणेगाव, सायळी(पुनर्वसन), कालगाव आदी भागात पावसाने हजेरी लावली. 

महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस 
महाबळेश्वर : महाबळेश्‍वरमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने उष्णतेने हैराण झालेल्या महाबळेश्‍वरवसियांना दिलासा मिळाला. गेले काही दिवस महाबळेश्‍वरमध्ये हवेत उष्मा चांगलाच वाढला असून रविवारी आभाळात ढग दाटून आले. त्यानंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. या मुसळधार पावसाने उकाडा कमी होवून हवेत गारवा निर्माण झाला.  या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. दुपारनंतर साधारणपणे एक तास जोरदार पाऊस पडत होता. या पावसाने वातावरणात चांगलाच आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता. जोरदार पडणार्‍या पावसामुळे बाजारपेठेत दुकानदार तसेच खरेदीस आलेल्या ग्राहकांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली.

तावदाने फुटली, वीजही गायब
वळवाच्या पावसाने रविवारी दुपारी सातारा शहर व उपनगरात हाहाकार माजवला. अचानक आभाळ भरून आले. सोसाट्याचा वारा सुरू झाला. वादळाचे हे तांडव भितीदायक होते. अनेक इमारतीमधील खिडक्यांची तावदाने फुटली. झाडे पडली, अनेक घरांचे पत्रेही उडून गेले. वीजही गायब झाली. वादळी वार्‍यांमुळे जनजीवन विस्कटून गेले.