होमपेज › Satara › शेखर गोरेंसह चौघांना ‘मोक्‍का’

शेखर गोरेंसह चौघांना ‘मोक्‍का’

Published On: Nov 15 2017 1:55AM | Last Updated: Nov 15 2017 12:48AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माण तालुक्यातील युवा नेते शेखर गोरे यांच्यासह त्यांच्या चार सहकार्‍यांविरुद्ध सातारा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगार कायद्यानुसार  (मोक्‍का) गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये म्हसवड नगरपालिकेच्या एका नगरसेवकाचाही समावेश असून संशयितांविरुद्ध खंडणी, दहशत निर्माण करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आतापर्यंत तिघांना अटक झालेली असून, शेखर गोरे यांचा पोलिस शोध घेत आहेत.

शेखर भगवानराव गोरे (रा. बोराटवाडी), संग्राम अनिलकुमार शेटे, विलास बापूराव पाटोळे, सतीश आनंदा धडांबे (तिघे रा. महिमानगड) व सागर शंकर जाधव (रा. महिमानगड, सर्व ता. खटाव) यांच्यावर मोक्‍का अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. म्हसवड पोलिस ठाण्यात संशयित पाचजणांसह एकूण 20 जणांवर खंडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांवर म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मालोजीराव देशमुख व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्माकर घनवट लक्ष ठेवून होते. वरकुटेे-मलवडी (ता. माण) येथे खंडणीसाठी गिरीराज रिन्यूएबल्स प्रा.लि. या कंपनीच्या जागेत घुसून जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडण्याची घटना 25 ऑक्टोबर 2017 ला घडली. या प्रकरणी शेखर गोरेंसह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित लोक खंडणीसाठी दहशत निर्माण करणे, दरोडा टाकून वाहने पळवणे अशा प्रकारचे गुन्हे करून आर्थिक फायदा करून टोळी चालवत असल्याचे समोर आले. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी शेखर गोरे टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्याकडे पाठवला. त्यांनी तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला. या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली असून, याचा तपास दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे करणार आहेत. अटकपूर्व जामिनासाठी शेखर गोरे यांनी वडूज न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.