होमपेज › Satara › गुंगीचे औषध देऊन चालकाला लुटले

गुंगीचे औषध देऊन चालकाला लुटले

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:13PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

मुंबई येथून मालट्रक घेऊन कर्नाटककडे जात असताना महामार्गावर लिफ्ट दिलेल्या एका प्रवाशाने नागठाणे (ता. सातारा) हद्दीत ट्रकचालकाला लस्सीतून गुंगीचे औषध देऊन लुटल्याची धक्‍कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सोमवारी सायंकाळपर्यंत चालक गुंगीच्या धुंदीत असल्याने त्याला नेमकी माहिती देता आली नाही.

मल्‍लपाड एस. कमनवर (वय 46, रा. कर्नाटक) असे ट्रकचालकाचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, मल्‍लपाड हा मुंबईहून ट्रक घेऊन निघाला होता. रविवारी रात्री तो आनेवाडी टोलनाका येथे आल्यानंतर त्याला एका प्रवाशाने लिफ्ट देण्याची विनंती केली. ट्रक घेवून दोघेही नागठाणे येथे आल्यानंतर एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले.

दोघांनीही जेवण केल्यानंतर चालक मल्‍लपाड हे हात धुण्यासाठी गेले. तोपर्यंत त्या प्रवाशाने हॉटेल चालकाकडून लस्सी घेतली. प्रवाशाने चालकाला ती घेण्यास आग्रह करुन पिण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघेही ट्रकमध्ये आल्यानंतर चालक मल्‍लपाड याला गुंगी आली. सोमवारी सकाळी ट्रक चालकाला जाग आल्यानंतर खिशातील पैसे, ऐवज नसल्याचे लक्षात आले. लस्सी पिल्यानंतर गुंगी आली व त्यानंतर संबंधित प्रवाशाने लुटल्याचे लक्षात आले.

घडलेल्या घटनेनंतर ट्रक चालकाने स्थानिकांच्या मदतीने बोरगाव पोलिस ठाणे गाठले मात्र चालकाची प्रकृती अस्थिर झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुंगी उतरली नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यामुळे अद्याप घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही.