Mon, Jul 13, 2020 11:23होमपेज › Satara › जन्मदात्या बापाकडूनच मुलांचा गळा दाबून खून

जन्मदात्या बापाकडूनच मुलांचा गळा दाबून खून

Last Updated: Oct 10 2019 12:14AM
खंडाळा/शिरवळ : वार्ताहर
आपल्याला क्षयरोग झाला असून यातून आपण वाचणार नाही. आपल्यानंतर आपल्या मुलांचे काय होईल, या नैराश्यातून वडिलांनीच आपल्या दोन पोटच्या गोळ्यांचा गळा घोटून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे शिंदेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली. चंद्रकात अशोक मोहिते (वय 37) असे नराधम पित्याचे नाव आहे. सध्या तो घाटकोपर येथे राहत आहे. तो सातारा जिल्ह्यातील असून रासाटी, ता. पाटण हे त्याचे गाव आहे. गौरवी मोहिते (11) व प्रतीक मोहिते (वय 7) अशी त्या गळे घोटलेल्या चिमुरड्यांची नावे आहेत.

रासाटी (कोयनानगर) ता. पाटण येथील मूळचे राहणारे मोहिते कुटुंबीय व्यवसाय व नोकरीनिमित्त घाटकोपर मुंबई येथे राहत आहेत. चंद्रकांत अशोक मोहिते हा पत्नी व दोन मुलांसमवेत मुंबईत राहत होता. त्याला क्षयरोग  झाल्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. यातूनच त्याची पत्नीशी वारंवार भांडणे होत होती. या आजारातून आपण वाचणार नसल्याने  आपल्यानंतर मुलांचे पालनपोषण व्यवस्थित होणार नाही, अशी चिंता त्याला सतावत होती.

मंगळवारी  दसरा असल्याने आपण मुलांना दांडिया पाहायला व खाऊ आणायला घेऊन जातो, असे सांगून मुलांना घेऊन चंद्रकांत हा घराबाहेर पडला.  

त्याच्याकडे असलेली मारूती कार(क्रमांक एम. एच. 01. बीटी. 8722) मधून गौरवी मोहिते व प्रतीक मोहिते यांना घेवून निघाला. रात्री बराच उशीर झाला तरी घरी परत न आल्याने कुटूंबियांनी फोन करून विचारणा केली. तेव्हा आपण वाशीच्या खाडी पूलावर असून जीव देणार असल्याचे सांगितले.  तेव्हा कटूंबियांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तसेच चिंताग्रस्त कुटुंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या कारला जीपीएस प्रणाली असल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात आला. रात्री अकरा वाजता त्यांची कार गहुंजे ( पुणे ) परिसरात असल्याचे निदर्शनास आले.

कुटूंबिय त्यांच्या शोधासाठी पुण्याकडे रवाना झाले. रात्री बाराच्या सुमारास शिवापूर येथील हॉटेलमध्ये मोहिते यांनी मुलांसमवेत जेवण केले. त्यानंतर साताराच्या दिशेने कार निघाली. रात्री दीडच्या सुमारास निरा नदी ओलांडून आल्यावर महामार्गाच्या कडेला एका कंपनीजवळ आला. या कंपनीकडे जाणार्‍या रस्त्यावर त्याने आपली गाडी लावली. यावेळी दोन्ही मुले झोपली होती. खून करण्यापूर्वी चंद्रकात हा दोन्ही मुलांना अर्धा तास न्याहळत होता. यानंतर त्याने दोन्ही मुलांचा गळा दाबून खून केला. 

चंद्रकांत हा पुन्हा मुंबईकडे जात असताना खेड शिवापूर टोलनाक्यावर पोलिस व मोहिते कुटूंबिय आले. यावेळी पोलिसंनी मुले कुठे आहेत? अशी विचारणा केल्यानंतर त्याने डिकीमध्ये असल्याचे सांगितले. पोलिसांनी डिकी उघडून पाहिले असता मुले दिसून आली. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
या घटनेची तक्रार राजगड पोलीस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय दराडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी चंद्रकात मोहिते याला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयासमोर ठेवले असता पोलिस कोठडी राखून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.