Sat, Jul 11, 2020 12:49होमपेज › Satara › प्रतापगडावर माकडांच्या धिंगाण्यात दगड निसटल्याने दुर्घटना

प्रतापगडावर माकडाने घेतला मुलाचा जीव

Published On: May 21 2018 9:24PM | Last Updated: May 21 2018 11:40PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

उन्हाळी हंगामामध्ये महाबळेश्‍वरमध्ये गर्दी झाली आहे. महाबळेश्‍वरहून जवळच असणार्‍या प्रतापगड येथेही नागरिकांची वर्दळ वाढली आहे. सोमवारी ओम प्रकाश पाटील (वय 13, उफाळेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) हा आपल्या कुटुंबीयांसोबत प्रतापगड किल्ल्याच्या पायर्‍या चढत होता. त्याचवेळी किल्ल्यावर माकडांचा कळप धिंगाणा घालत होता. यामध्ये माकडांच्या धक्क्याने 100 ते 150 फुटांवरून दगड निसटून ओमच्या डोक्यात पडला. यामध्ये ओम जागीच ठार झाला. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्‍त करण्यात येत होती. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, सध्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. प्रकाश पाटील हे व्यवसायाने शिक्षक आहेत. मुलांना सुट्ट्या असल्याने सोमवारी ते महाबळेश्‍वर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर पत्नी लता, मुलगा, ओम मुली प्रणोती व प्राणाली होत्या. सकाळी ऑर्थरसीट पॉइंट व क्षेत्र महाबळेश्‍वर दर्शन करून ते महाबळेश्‍वरमध्ये आले होते. त्यानंतर दुपारचे जेवण करून ते तीन च्या सुमारास प्रतापगड किल्‍ला पाहण्यासाठी गेले होते. किल्ल्याच्या पायथ्याला गाडी लावून ते गडाच्या पायर्‍या चढत होते.

गडावरील पायर्‍यांवर भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी महिला बसलेल्या असतात. किल्ल्यावर असणार्‍या माकडांना खाण्यासाठी पर्यटक या शेंगा घेऊन जातात. सोमवारीही किल्ल्यावर माकडांचा कळप होता. त्यांना शेंगा न मिळाल्याने त्यांचा धिंगाणा सुरू होता. या धिंगाण्यातच एका माकडाचा दगडाला धक्‍का लागून तो दगड खाली पडला. हा दगड थेट पायर्‍या चढत असलेल्या ओमच्या डोक्यात पडला.

यामुळे ओमचे डोके फुटून रक्‍तस्त्राव झाला. यामध्ये ओमचा जागीच मृत्यू झाला. हे पाहताच ओमच्या आई व बहिणींनी एकच हंबरडा फोडला.  या अनपेक्षित घटनेमुळे वातावरण सुन्‍न झाले होते. ही घटना पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले होते. या घटनेनंतर पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांनी ओमला कुंभरोशी येथील रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी ओम मयत असल्याचे सांगितले. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Tags : boy killed, pratapgadh, stone, fell, head, monkey, satara news