होमपेज › Satara › बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा माढ्याकडे

बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा माढ्याकडे

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 13 2019 1:36AM
फलटण : प्रतिनिधी 

बारामती व इंदापूरला नियमबाह्य जाणारे 60 टक्के पाणी माढ्याला देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने बुधवारी घेतला. बारामतीचे पाणी पुन्हा माढ्याकडे वळवण्यात आले. माढ्याचे खा. रणजितसिंह ना. निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. हा निर्णय म्हणजे सरकारचा शरद पवारांना दणका असल्याचे मानले जात आहे. खा. रणजितसिंह यांनी बुधवारी सायंकाळी नीरा देवधरचे राखीव पाण्याचे वितरण असलेल्या वीर धरणातून फलटण व माढ्याच्या दिशेने पाणी सोडून त्याचे पूजन केले.

वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचे धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्यांना पाणी मिळत होते. 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवधर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्यांना आणि 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांना देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होते.

नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती व इंदपूरला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. यासाठी खा. रणजितसिंह ना. निंबाळकर व रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. खा. रणजितसिंह यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालकांशी चर्चा केली होती. ही चर्चा झाल्यानंतर अधिकार्‍यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. याच पार्श्‍वभूमीवर खंडाळ्यात नीरा देवधरचे हक्‍काचे पाणी मिळावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. तर सांगोल्यात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गळफास घेण्याचा इशारा दिला होता. यानंतर माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ही घेतली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्तांना हक्‍काचे पाणी देण्याची भूमिका घेतल्याने या भेटीनंतर जलसंपदा विभागाने हा आदेश काढला.  हा आदेश  स्वीकारण्यासाठी मुंबई येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, विराज खराडे, श्रीकांत देशमुख  उपस्थित होते. 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करार संपल्यानंतर देखील नियमबाह्य पाणी बारामती तालुक्याला दिले जात होते. हे पाणी पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला मिळणार आहे. बारामतीचे पाणी आता बंद करण्यात आल्याने खा. शरद पवार यांना मोठा धक्‍का बसला आहे. 

निरा देवधरचे पाणी वीर धरणात आणून बारामतीला दिले जात होते. त्याच ठिकाणी खा. रणजितसिंह यांनी पाणी पूजन करून पाणी फलटण व माढ्याच्या दिशेने सोडले. यावेळी आ. जयकुमार गोरे,माजी आमदार  शहाजी बापू पाटील, सांगोला भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत देशमुख, जि.प. सदस्या अ‍ॅड. जिजामाला ना. निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, सौ. मंदाकिनी ना. निंबाळकर, सौ. मंगलादेवी ना. निंबाळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्तांना पाणी देऊ शकलो याचे समाधान : खा. रणजितसिंह

सरकारने दुष्काळग्रस्तांचे स्वप्न पूर्ण केले आहे. खा. शरद पवार यांना दणका देण्यापेक्षा माढा मतदारसंघात दुष्काळग्रस्तांना पाणी देऊ शकलो, याचे समाधान आहे.  सांगोला व पंढरपूर या तालुक्यांनाही या पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी सरकारला प्रस्ताव दिला होता. तो सरकारने मान्य केला आहे. त्यामुळे आता या पाण्याचा लाभ 10 लाख लोकसंख्येला होणार आहे. बारामती व माढ्याचा पाण्याचा संघर्ष आता संपला आहे. बारामतीकरांनी सामावून घेण्याची भूमिका घेतली नाही, तर फलटण-बारामती रेल्वेचा असाच संघर्ष होऊ शकतो. सोलापूरमधील आमदारांना याची माहिती होती. मात्र, यावर बोलण्याचे कोणी धाडस केले नव्हते. कालवा समितीच्या सदस्यांच्या मान्यतेने व तत्कालीन जलसंपदामंत्री ना. रामराजेंच्या सहीनेच हे पाणी बारामतीला जात होते.