होमपेज › Satara › पाणीदार पाटण तालुक्याची कोरडी व्यथा 

पाणीदार पाटण तालुक्याची कोरडी व्यथा 

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 8:53PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 

महाराष्ट्राचीच नव्हे तर पूर्वेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील सिंचनाची गरज भागविण्यात यशस्वी ठरलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरणासह अन्य छोट्या-मोठ्या धरणांच्या याच तालुक्यातील अजूनही काही गावे, वाडी, वस्त्या आजही पाण्यासाठी तहानलेल्याच आहेत. इतरांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी व त्यांची तहान भागविण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला खरा मात्र त्याच प्रकल्पग्रस्तांना अद्यापही हक्काचे पाणी मिळाले नाही. घागरभर पाण्यासाठी आजही या जनतेला काही किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. निश्‍चितच पाणीदार तालुक्याची ही कोरडी व्यथा आजही कायम आहे ही  शोकांतिका आहे.

पाटण तालुक्यात पावसाळ्यात अतिवृष्टी, महापूर तर उन्हाळ्यात यापैकीच अनेक गावे, वाड्या वस्त्या याच पाण्यासाठी तहानलेल्या असतात. मुळात यात खेदाची व तितकीच वेदनादायी बाब म्हणजे ज्या ज्या विभागात लहान, मोठी धरणे आहेत या धरणांसाठी ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला दुर्दैवाने अशाच काही गावांच्या अगदी हाकेच्या अंतरावरील गावात अजुनही पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी असो किंवा राज्यकर्ते व प्रशासन त्यांना या व्यथा कशा दिसणार? अनेक गावात पाणी योजना केवळ कागदोपत्रीच झाल्या. मात्र राजकीय ठेकेदारी जोपासण्यासाठी याचा वापर झाला. 

यातून लाखोंची नव्हे तर कोट्यवधीची बिले अदाही झाली. परिणामी अनेक गावात या योजना म्हणजे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या. याचा स्थानिकांना काहीच फायदा नाही. त्यामुळे अशा योजनांचीही वस्तूस्थिती तपासून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. 

तालुक्याचा एप्रिल ते जून असा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये 21 गावांचा व 34 वाड्यांचा समावेश आहे. त्यात डावरी, बाहे, गलमेवाडी, रिसवड, सुळेवामडी, चाळकेवाडी, ढोकावळे, आटोली, हुबंरणे, गुरेघर, नारळवाडी, डेरवण, तामीणे, सुतारवाडी, जुगाईवाडी, भुडकेवाडी, दुसाळे, बहुले, नानेगाव खुर्द, वजरोशी या गावांचा व बौद्धवस्ती डावरी, शिद्रुकवाडी  (कोरीवळे), शिद्रुकवाडी -वायचळवाडी (गुढे), पाडेकरवाडी (मालोशी), सदुवरपेवाडी (सळवे), पवारवस्ती (कुसरूंड), मस्करवाडी नं. 2,  केंजळवाडी - धनगरवस्ती (निवडे), घाटेवाडी (मालोशी), चाफेर (मिरगाव), सवारवाडी (कडवे बु.), धुमाळवस्ती (विहे), मसुगडेवाडी  (केळोली), जंगलवाडी (तारळे), यमकरवस्ती, करांडेवस्ती, परांडेवस्ती, सावंतवस्ती (पानेरी), बौद्धवस्ती (मणेरी), कदमवस्ती  ( सळवे), आंबेवाडी (घोट), जंगलवाडी (चाफळ), शिद्रुकवाडी  (धावडे), धडामवाडी (केरळ), उंब्रजकर वॉर्ड, डांगळवॉर्ड, सुतारवॉर्ड, पाटील वॉर्ड (नाटोशी) या वाड्यांचा समावेश आहे. 

यासाठी प्रस्तावित नवीन विंधन विहिरी 28,  नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती 15, टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करणे 5, खाजगी विहिरी अधिग्रहण करणे 1, विहिर खोल करणे, गाळ काढणे व आडवी बोअर घेणे 5 असे प्रस्तावित असून यासाठी अंदाजीत खर्च 63.14 लाख रुपये इतका गृहीत धरण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता पाटील यांनी दिली.

 

Tags : satara, Patan news, Water, Water problem,