Fri, Sep 20, 2019 22:08



होमपेज › Satara › मतदान करणे देशसेवेचाच एक भाग 

मतदान करणे देशसेवेचाच एक भाग 

Published On: Apr 22 2019 1:35AM | Last Updated: Apr 21 2019 11:06PM




मतदान करणे देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया  हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी. भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सातारा जिल्ह्यातही या विशेष दिनानिमित्त  जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन, जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व ज्युनियर कॉलेज मधून युवक-युवतींसाठी मतदान करणे का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, निबंध स्पर्धा, शाहीरांच्या पोवाड्यातून जनजागरण आदी उपक्रम राबवण्यात येतात. विशेषत: 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जात असतोे.  भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी कार्यरत असणार्‍या अधिकारी व कर्मचारी वर्गाला मतदान करण्याच्या किंवा त्यांनी मतदानाचा हक्क बजवावा या प्रक्रियेत शंभर टक्के सहभागी करण्याचे निर्देश दिले आहेत.   मतदारांनी भविष्य काळात येणार्‍या निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्‍क बजावून एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपले मतदानाच्या स्वरूपात सहकार्य लाभावे हीच छोटीशी अपेक्षा.

विशाल गुजर