होमपेज › Satara › लाचखोर वकिलास पोलिस कोठडी

लाचखोर वकिलास पोलिस कोठडी

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 16 2019 10:46PM
सातारा : प्रतिनिधी

येथील ग्राहक न्यायालयाबाहेर 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केलेल्या अ‍ॅड. शिवराज पाटील (वय 30, मूळ रा. निगडी, ता. कराड) याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. दरम्यान, पोलिस कोठडी मिळाल्याने एसीबीच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

ग्राहक न्यायालयातील न्यायाधीशाला 50 हजार रुपयांची लाच देऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, असे सांगून अ‍ॅड. शिवराज पाटील याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्याने या प्रकरणातील तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये (एसीबी) तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे समोर आले. लाचेची रक्‍कम बुधवारी सकाळी सातार्‍यातील ग्राहक न्यायालयाच्या बाहेर रस्त्यावर स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

थेट न्यायाधिशांना 50 हजार रुपये देवून निकाल आपल्या बाजूने लावून घेतो, असे सांगितले गेल्याने न्यायदान क्षेत्रात खळबळ उडाली होती. एसीबीने याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन वकिलाला अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या प्रकरणात साखळी आहे का? कोणाकोणाचा सहभाग आहे? अशा विविध मुद्यांचा तपास करायचे असल्याचे सांगून एसीबीने पोलिस कोठडीची मागणी केली होती. सरकार पक्षाचा युक्‍तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी वकिलाला 2 दिवसांची पोलिस कोठडी दिली.