Mon, Sep 16, 2019 11:45होमपेज › Satara › पाणीपुरवठा विहिरीत विषारी औषध

पाणीपुरवठा विहिरीत विषारी औषध

Published On: Apr 30 2019 1:53AM | Last Updated: Apr 30 2019 1:53AM
पळशी :  वार्ताहर

भाडळे (ता. कोरेगाव) येथे भवानीनगर परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या युन्‍नुस शिकलगार यांच्या विहिरीत अज्ञात व्यक्‍तीने रविवारी रात्री विषारी औषध टाकले. या औषधामुळे पाणी दूषित झाले असून विहिरीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, भाडळे गावाला पाणी पुरवठा करणार्‍या चार विहिरी आहेत. गावालगत असलेल्या भवानीनगर या परिसराला सामाजिक बांधिलकीतून युन्‍नुस राजेखान शिकलगार हे आपल्या विहिरीवरून विनामोबदला पाणी पुरवठा करत आहेत. या विहिरीतील पाण्यामुळे सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे लोकांचा आणि 250 पेक्षा जास्त जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न संपुष्टात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील काही लोकांनी शिकलगार यांना विहिरीवरून भवानीनगरला पाणी पुरवठा करू नकोस,     अशी धमकी दिली होती. तरीदेखील शिकलगार यांनी पाणी पुरवठा सुरुच ठेवला होता. रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी शिकलगार यांच्या विहिरीत विषारी औषध टाकले. सोमवारी सकाळी ते पाणी सोडण्यासाठी विहिरीवर गेले असता, त्यांना विहिरीतील मासे मृत्युमुखी पडले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना याबाबतची माहिती दिली. सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली, त्यांनी पंचायत समितीमध्ये या विषयी माहिती दिली. तसेच पोलीस ठाण्यात देखील कळविले. 

खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने चारही विहिरीतील पाणी सोडले नाही. जे टँकर दररोज विहिरीत पाणी ओतायचे, ते थांबवून, त्यांच्याद्वारे थेट पाण्याचे वितरण करण्यात आले. सहाय्यक गटविकास अधिकारी अल्तमास सय्यद, विस्तार अधिकारी एस. एस. जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एस. जी. पत्की, किन्हई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैकीय अधिकार्‍यांनी विहिरीची पाहणी केली. ग्रामविकास अधिकारी व्ही. ए. आदलिंगे यांनी तक्रार दिली असून, वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ऐन दुष्काळात तेरावा महिना

भाडळे हे गाव पंचक्रोशीतील मुख्य गाव असून, दरवर्षी या गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या भाडळे येथे दिवसातून दोन टँकरद्वारे पाणी दिले जात असून, हे पाणी विहिरींमध्ये सोडून, नळाद्वारे वितरित केले जात आहे. गावाला दुष्काळाच्या झळा बसत असताना केवळ राजकीय द्वेषातून अज्ञात व्यक्‍तीने हे कृत्य केले आहे. एकंदरीत एका व्यक्‍तीने गाव वेठीस धरले असून ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.