Sun, Oct 20, 2019 01:53होमपेज › Satara › भवानी तलवारीची शाही मिरवणूक

भवानी तलवारीची शाही मिरवणूक

Last Updated: Oct 09 2019 11:38PM

पोवईनाका येथे श्री भवानी तलवारीचे पूजन करताना श्री.छ. उदयनराजे भोसले व मान्यवर. (छाया : साई फोटोज)सातारा : प्रतिनिधी
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सातारच्या जलमंदिर पॅलेस येथे विजयादशमी सीमोल्‍लंघन सोहळा  उत्साहपूर्ण, मंगलमय वातावरणात, फटाक्याच्या आतषबाजी व अलोट गर्दीत पार पडला. प्रारंभी राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत जलमंदिर पॅलेस येथे श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते श्री भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले.

जलमंदिर येथे भवानी तलवारीचे विधीवत पूजन झाल्यानंतर सायंकाळी 5.15 वाजता शाही मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी हलगी, वाद्य पथक होते. टेम्पोमध्ये आकर्षक व विविधरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये श्री भवानी तलवार ठेवण्यात आली होती. पालखीच्या पुढे सनई-चौघडा वाजत होता. पालखीच्या दोन्ही बाजूला शिंग-तुताऱ्या निनादात होत्या. मिरवणुकीच्या अग्रस्थानी अश्वधारी पथक होते. मिरवणुकीत फेटेधारी मावळे, युवक व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले  होते. मिरवणूक पोवईनाक्यावर पोहोचल्यावर तेथे तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते  भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. पुजन झाल्यावर उदयनराजे भोसले यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवईनाक्यावरील पुतळयाला पुष्पहार अर्पण केला. ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी हजारो नागरिक, मान्यवर उपस्थित होते.

राजघराण्यातील परंपरेप्रमाणे सीमोल्‍लंघन झाल्यावर श्री भवानी तलवारीसह ही मिरवणूक पुन्हा जलमंदिर पॅलेस येथे दाखल झाली. तेथे विधीवत पूजन आणि औक्षण झाल्यावर राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ.उदयनराजे भोसले व श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, युवराज वीरप्रतापसिंहराजे, युवराज्ञी नयनताराराजे भोसले यांनी उपस्थित नागरिकांकडून आपटयांच्या पानेरुपी सोन्याचा स्वीकार केला.

विजयादशमीमुळे जलमंदिर पॅलेस उजळले

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक सातार्‍यात दरवर्षी सीमोल्‍लंघन सोहळा पार पडतो. यंदाही हा सोहळा श्री. छ. उदयनराजे भोसले व त्यांच्या कुटूंबियांच्या साक्षीने जलमंदिर पॅलेस येथे पार पडला. या सोहळ्यासाठी पॅलेसवर आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता.