Tue, Sep 17, 2019 04:26होमपेज › Satara › धोकादायक शाळांमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

धोकादायक शाळांमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:10PMकराड : अशोक मोहने 

भौतिक व पायाभूत सुविधा पुरवून जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ज्या शाळेत बसून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्या शाळाच धोकादायक बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कराड तालुक्यात तब्बल 132 वर्ग खोल्या धोकादायक असून त्या तात्काळ पाडण्यात याव्यात, असे पत्र बांधकाम विभागाने दिले आहे. मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला आहे.

दरम्यान गेल्या दोन वर्षापासून वर्गखोल्यांचे शेकडो प्रस्ताव शिक्षण विभागात धूळ खात पडून आहेत. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत व भौतिक सुविधा   पुरविण्याबरोबर गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू असताना ज्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या शाळांच धोकादायक असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कराड तालुक्यात 132 वर्गखोल्या धोकादायक असून या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये अशा सूचना शिक्षण विभागाने संबंधित मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. गेल्या चार वर्षात एकाही वर्ग खोल्यांसाठी अनुदान प्राप्त नसल्याने धोकादायक खोल्यांमध्ये  आजही विद्यार्थी बसविले जात आहेत. काही शाळांमध्ये इयत्ता चौथी, पाचवी एकाच वर्गात आणि पहिली, दुसरी एकाच वर्गात बसवून ज्ञानार्जनाची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही तेथे शिक्षणाची काय अवस्था,अशी चिंता पालकवर्गातून व्यक्त होत आहे. 

गेल्या चार वर्षात वर्गखोल्यांसाठी अनुदानच प्राप्त झालेले नाही. त्यामुळे धोकादायक ठरविण्यात आलेल्या वर्गखोल्या पाडून विद्यार्थ्यांना बसवायचे कोठे या विवंचनेत शिक्षक आहेत. त्यांची भावना चांगली असली तरी भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? विद्यार्थ्यांची व शाळांची गुणवत्ता प्रतिवर्षी अधिकार्‍यांकडून तपासली जाते, वर्षभरात शिक्षकांसाठी अनेक प्रशिक्षण, कार्यशाळा घेतल्या जातात पण ज्यांच्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे ते विद्यार्थीच सुरक्षित नसतील तर ही प्रशिक्षणे निरर्थकच ठरतात. 


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex