Mon, Sep 16, 2019 11:35होमपेज › Satara › धारेश्‍वर दिवशीला एकदा यावेच..

शिवमंदिरांमध्ये घुमतोय भक्तीचा जागर!

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 9:03PMकराड : प्रतिनिधी

श्रावण महिना सुरू झाल्यापासून दर सोमवारी कराडसह पाटण तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे या महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेव मंदिरात भक्तीचा जागर सुुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. डोंगरमाथ्यावर असलेल्या महादेव मंदिरामध्ये जावून दर्शन घेण्याकडे भक्तांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कराडलगत असलेल्या सदाशिव गडासह आगाशिव डोंगरावरील महादेव मंदिरांबाहेर दर सोमवारी भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. तिच परिस्थिती शहरातील तसेच इतर ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरांमध्येही दिसून येत आहे. याबाबत धारेश्‍वर दिवशी मंदिर, खळे येथील अतिप्राचिन शिवमंदिर तसेच वाल्मिकी पठारावरील मंदिरासह येराडवाडीचे रूद्रेश्‍वर तर कडवे बुद्रुक येथील अखंड पाषाणातील महादेव मूर्ती यासह कराड व पाटण तालुक्यातील महादेव मंदिरांचा दैनिक ‘पुढारी’ने घेतलेला आढावा...  

पाटण : गणेशचंद्र पिसाळ 

एकाच ठिकाणी निसर्गाचा अविष्कार, धार्मिकता, आध्यात्मिकता आणि त्याला असणारी ऐतिहासिक जोड असे पवित्र ठिकाण लाभलेल्या पाटण तालुक्यातील धारेश्‍वर दिवशी येथील प्रसिद्ध शिव शंभू मंदीर. याचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी श्रावणात किमान एकदा तरी धारेश्‍वर दिवशीला यावे अशी साद निसर्ग घालत आहे. 

पाटणच्या उत्तरेस 17 कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत श्रीराम काळात खोदलेल्या गुहेत श्रीराम मंदिर व महादेवाचे हे तिर्थस्थान. निसर्गरम्य गुहेतून कोसळणार्‍या धबधब्याखाली हे मंदिर आहे. मंदीरावरचा धबधबा आणि निसर्गरम्य पवित्र वातावरण पहाता भक्त असो किंवा पर्यटक त्यांना येथील धबधब्याखाली आंघोळीचा मोह आवरत नाही. त्यामुळे शक्यतो येथे या काळात आंघोळ करूनच दर्शनाचा योग साधला जातो. श्री ज्ञानेश्‍वरीच्या पवित्र ग्रंथात श्री धारेश्‍वर दिवशीचा उल्लेख असल्याने या ठिकाणाला धार्मिक क्षेत्रातही अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

श्रीराम व पांडव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर बारा वर्षांनी त्रंबकेश्‍वर नाशिक येथील कुंभमेळ्यावेळी धारेश्‍वर धबधबा शिवशंभु महादेवाच्या पिंडीवरून भागीरथी दुधगंगा प्राप्त होते, असे सांगितले जाते. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. येथील यात्रा दिवाळीत असते. या यात्रेत काठेपालखी मिरवणूक ही वैशिष्ट्य मानले जाते. काठेपालखीवर लोखंडी टोकदार सळ्यांच्या काठावर मानकर्‍यांना झोपवून त्यांची मंदिर परिसरातून मिरवणूक काढली जाते. येथे भक्त व पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने निवासी सोय करण्यात आली आहे. तेथे निसर्ग, पवनचक्क्या प्रकल्प, दूरदृष्टी टेकडी, घेरादातेगड  ( सुंदरगड), निवकणे तिर्थस्थान, देवघर ही जवळची धार्मिक व पर्यटन केंद्रे आहेत.