Tue, Jul 23, 2019 18:36होमपेज › Satara › अभियंता हा समाजाचा खरा आधारस्तंभ

अभियंता हा समाजाचा खरा आधारस्तंभ

Published On: Sep 15 2018 1:49AM | Last Updated: Sep 14 2018 11:21PMसातारा : प्रतिनिधी

अभियंत्यांचे श्रद्धास्थान कै. सर विश्‍वेश्‍वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने... अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी, पदविकाप्राप्‍त करताना स्थापत्य शाखेतील मूलभूत ज्ञान दिले जाते. पदवी, पदविका घेवून बाहेर पडल्यावर त्याचा  प्रत्यक्ष वापर होतो. अभियांत्रिकी क्षेत्रातील नवनवीन शोध, घडामोडीकडे लक्ष घेवून कायम ज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. खरे तर स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात निसर्ग नियमांना फार महत्व आहे. कोणतीही गोष्ट निसर्गाच्या नियमाविरुद्ध जावून देता कामा नये. तसे केल्यास कालांतराने त्याचे परिणाम भोगावे लागतात. नैसर्गिक आपत्तीतून आपण हे शिकले पाहिजे.

अभियंता हा सरकारी खाते, खासगी क्षेत्र अथवा स्वावलंबी उद्योग अशा कोणत्याही क्षेत्रात असू दे. कोठेही  काम करताना आपण आपल्या कर्तव्याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. प्रत्यक्ष कामकाजातून आलेल्या अनुभवाची शिदोरी नेहमी मनात बाळगली पाहिजे अथवा बाणाच्या भात्यासारखी जवळ बाळगली पाहिजे. त्या अनुभवातून प्रत्यक्ष कामकाजात अथवा इतरांना त्याचा योग्यवेळी उपयोग होण्यास मदत झाली पाहिजे. स्थापत्य क्षेत्रातील अनुभव हे यशापेक्षा अपयशातून जास्त समृद्ध बनतात. त्यालाच लर्निंग फ्रॉम फेल्युअर्स असे संबोधले जाते. कोणत्या चुकीमुळे काय घडले व ती चूक पुन्हा घडू नये म्हणून काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन वेळोवेळी देता आले पाहिजे. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहेत व त्यांच्यासाठी आपण देणे लागतो याची आंतरिक जाणीव ठेवल्यास व त्याप्रमाणे कार्यतत्पर राहिल्यास कार्यसाफल्याचा आनंद मिळतो.

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा असे आहे की प्रत्येक कामाची व त्या कामाच्या यश - अपयशाची जबाबदारी ही संबंधित अभियंता  यालाच द्यावी लागते. इतर क्षेत्रासारखे संमतीपत्र लावता येत नाही. यासाठी अभियंत्यांनी प्रगल्भ होवून अभियांत्रिकी ज्ञान वाढवणे गरजेचे आहे. अभियंत्यांनी आजच्या परिस्थितीत सतत कर्तव्याची जाणीव ठेवून सोबत अनुभवाच्या बाणांचे भाते ठेवून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच अभियंत्यांसाठी अभियांत्रिकी ज्ञान, कर्तव्याची जाण, अनुभवाचे बाण व सामाजिक भान ही चतु:सुत्री आवश्यक आहे.