Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Satara › बनवडीतील भोंदूबुवा पोलिसांच्या जाळ्यात

बनवडीतील भोंदूबुवा पोलिसांच्या जाळ्यात

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:39PMकराड : प्रतिनिधी

स्वत:कडे दैवी शक्‍ती असल्याचे भासवून बनवडी (ता. कराड) येथील दर्ग्यामध्ये ताईतद्वारे मंत्र-तंत्र म्हणून साखळदंड उचलण्याचे नाटक करत लोकांची दिशाभूल करणार्‍या भोंदूबुवाचा पोलिसांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला. पोलिस व ‘अंनिस’ने सुमारे दोन तास केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर संबंधित भोंदूबुवाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई केली. शनिवार, दि. 11 रोजी झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. सद्रुद्दीन सल्लाउद्दीन मुल्ला ऊर्फ सुफीसाब (वय 48, रा. बनवडी, ता. कराड) असे कारवाई केलेल्या भोंदूबुवाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सद्रुद्दीन मुल्ला हा गेली आठ ते दहा वर्षांपासून बनवडी येथील अद्दुल्ला गारीशा कादरी दर्गा येथे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणूक करत होता. यांची माहिती अनिसच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी सुमारे वर्षभरापासून दर अमावशा व पोर्णिमेला त्याच्याकडे कार्यकर्ते पाठवून खरच सुफीबाब लोकांची फसवणूक करत असल्याची खात्री केली. अनिसच्या कार्यकर्त्यांची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने शनिवारी सापळा लावला. त्यानुसार सकाळी अनिसचे कार्यकर्ते भगवान रणदिवे व महिला पोलिस कर्मचारी आशा ओंबासे तेथे गेले. त्यावेळी भोंदूबुवा सुफीबाबने त्यांना अघोरी प्रकार करून त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर भोंदूबुवाने भुुतबाधा झाल्याचे सांगत त्याच्यापासून सुटका करायची असेल तर 25 लिंबू, पाण्याची बाटली व तेल मागितले. त्याने मागितलेले सर्व साहित्य दिल्यानंतर भोंदूबुवाने प्रत्येक लिंबूवर काहीतरी लिहल्यासारखे करून ते बाजुला ठेवले. तसेच तेथेच जवळच असलेला साखळदंड उचलल्याचे नाटक करून तुम्हाला भविष्यातही अधिक त्रास होऊ शकतो, असे सांगू लागल्यानंतर हा खरच स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणूक करत असल्याची पोलिसांची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी भोंदूबुवाला ताब्यात घेत त्याचे सर्व साहित्य जप्त केले. हे सर्व तो अमावशा व पोर्णिमेच्या दिवशीच करत होता. त्यामुळे त्याच्याकडे लांबून लोक येत होते. या कारवाईवेळी डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस कर्मचारी व अनिसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शनिवारी जळगावहून एक जोडपे मुल होत नाही म्हणून त्याच्याकडे आले असल्याची माहिती अनिसचे प्रशांत पोतदार यांनी सांगितले. भगवान रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोंदूबुवावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. नि. सर्जेराव गायकवाड करत आहेत.