Mon, Jul 13, 2020 22:04होमपेज › Satara › नढवळ तलावामध्ये दिवस-रात्र वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच

नढवळ तलावामध्ये दिवस-रात्र वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच

Published On: May 08 2019 1:58AM | Last Updated: May 07 2019 10:53PM
वडूज : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून नढवळ (ता. खटाव) येथील येरळा तलावात वाळू माफियांची दहशत माजवत बेसुमार बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केला आहे. हा वाळू उपसा दिवस-रात्र जेसीबी मशिन व मजुरांच्या साहाय्याने सुरू असताना पोलिस व महसूल प्रशासनाकडे नागरिकांसह अनेक सामाजिक संघटनांनी तक्रारी करूनही कारवाई का नाही? याची जोरदार चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे. 

नढवळ येथील येरळा तलावातून खुलेआम वाळू उपसा होत असताना वाळू माफियांच्या नेटवर्कमुळे कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच पोलिस पथकाला रिकाम्या हाताने माघारी यावे लागत आहे. हा अवैध वाळू उपसा करीत असताना वाळू माफियांनी नढवळ व परिसरांमध्ये एवढी दहशत माजवली आहे की, वाळू माफियांकडून शेतकरी व महिलांना दमदाटी करत व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याची चर्चा सुरु आहे.
येरळा तलावातून अवैध वाळू उपसा करीत असताना दहिवडी प्रांत कार्यालय, वडूज तहसीलदार कार्यालय, वडूज पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक अल्पवयीन तरुणांना पैशाचे आमिष दाखवून कामाला ठेवण्यात येत आहे. त्यामुळे तहसीलदार, प्रांत, पोलिस निरीक्षकांसह सर्व कर्मचार्‍यांवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवत येरळा तलावातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. नढवळ येथील वाळू माफियांनी चक्क महसूल व पोलिस प्रशासनाला चॅलेंज दिल्यामुळे सामान्य जनतेचे काय असा सवाल या निमित्ताने निर्माण होत आहे. 

सध्या याठिकाणी नवीन वाळूमाफियांनी डोके वर काढले असून आपल्या आलिशान गाड्यामधून भरधाव वेगाने या परिसरात दहशत माजवली आहे. काही दिवसांपूर्वी नढवळ शेजारी अंबवडे येथे अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांना डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांनी खाक्या दाखवत वाळू माफियांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते. परंतु महसूल विभाग कारवाई करताना दिरंगाई का करतेय? असा सवाल सामान्य नागरिकांतून होत आहे.