Sun, May 31, 2020 16:43होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात सहावा कोरोना पॉझिटिव्ह

सातारा जिल्ह्यात सहावा कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Apr 07 2020 11:06PM
सातारा  (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची छाया दिवसेंदिवस गडद होत चालली असून खेड परिसरातील मृत हा कोरोना पॉझिटिव्हच असल्याचा अहवाल सोमवारी रात्री उशिरा नव्याने प्राप्त झाला. मृत रुग्णाच्या 15 व्या दिवसाच्या स्वॅब अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सहा झाला असून, मंगळवारी दिवसभरात नवे 16 कोरोना संशयित दाखल झाले तर पूर्वीच्या 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना संसर्गाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होत चालला आहे. 15 दिवसांपूर्वी एकाच दिवसात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यामध्ये कॅलिफोर्निया येथून खेडमध्ये आलेल्या 63 वर्षीय पुरुषाचा तर अबुधाबी येथून खंडाळ्यात आलेल्या महिलेचा समावेेश होता. जिल्हा प्रशासनाने व वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही बाधितांवर उपचार सुरू केले. उपचाराला दोन्ही रुग्णांनी चांगला प्रतिसादही दिला. 14 दिवसानंतर दोन्ही बाधितांचे पुन्हा स्वॅब पाठवले असता ते निगेटिव्ह आले. जिल्ह्याच्या कोरोनाच्या पहिल्याच लढाईत यश एका पावलाच्या अंतरावर होते. 15 व्या दिवशी पुन्हा स्वॅब  पाठवले जाण्याची तयारी सुरू असतानाच कॅलिफोर्नियावरून आलेल्याची खेडच्या 63 वर्षीय रुग्णाची प्रकृती बिघडली व त्यातच सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला होता. 

या घटनेने जिल्हा हादरुन गेला. जिल्हा प्रशासनाने मृताचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे दिले. मात्र 15 व्या दिवसाच्या अहवालात तो पॉझिटिव्हच असल्याचे समोर आले. दुसरीकडे निझरे ता.जावली येथील बाधिताच्या मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला. दुहेरी संकट असतानाच कोल्हापूरमध्ये सापडलेली पॉझिटिव्ह महिला कोरेगाव तालुक्यातील बनवडी व फलटण येथे  वास्तव्य करुन गेल्याने पुन्हा जिल्हावासियांच्या काळजात धस्स झालं. 

मंगळवारी कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथेही एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या सहा झाली. सोमवारी पाठवलेल्या अहवालांपैकी एकूण 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामध्ये सातारा सिव्हीलमधील 9 व कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधील 6 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, संशयितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यातून 16 जण अ‍ॅडमिट झाले असून त्यांचे स्वॅब काढून पुण्याला पाठवण्यात आले आहेत.