Thu, May 23, 2019 22:13
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › शरद पवार पुन्हा माढ्यातून?

शरद पवार पुन्हा माढ्यातून?

Published On: Mar 15 2019 1:46AM | Last Updated: Mar 14 2019 10:58PM
सातारा / खटाव : प्रतिनिधी 

माढा  लोकसभा मतदारसंघातून माघारीचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राज्यातून उठलेल्या प्रतिक्रिया व विरोधी पक्षांनी त्याचे केलेले भांडवल लक्षात घेऊन धक्का तंत्र वापरत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे.

लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. आघाडी आणि युतीचा घोळ अद्याप मिटला नसल्याने काही जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात सर्वच पक्षांना अडचणी येत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघात मात्र पवार यांनी निवडणूक लढायला अचानक नकार दिल्याने पेच वाढला आहे. अगोदर राष्ट्रवादीअंतर्गत लाथाळ्या थांबवण्यासाठी निवडणुकीला उभे राहात असल्याचे वातावरण पवारांनी तयार केले होते. नंतर कौटुंबिक कारण आणि एकाच घरातील तीन उमेदवार नकोत म्हणून त्यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीने राष्ट्रवादीचीच हालत खराब झाल्याचे आता दिसत आहे. रणजितसिंह मोहितेंनी भाजपाशी जवळीक साधली आहे. संजयमामांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांनी लोकसभेला लढण्याची  तयारी केली नसल्याचे सांगितले आहे. दोघांनीही हालचाली करुन दबाव वाढवला आहे. मोहिते-पाटलांना उमेदवारी दिली तर अंतर्गत हेवेदाव्यांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे पवारांना चांगलेच माहित आहे. भाजपानेही या परिस्थितीचे आकलन केले आहे. त्यामुळे मोहितेंचे दबावतंत्र कितपत यशस्वी होतेय हे उद्यापर्यंत समजणार आहे. राष्ट्रवादीला मोहितेंना तिकीट द्यावे लागले तर विरोधी गट चांगलाच सरसावणार आहे. भाजपाकडून लढले तरी परिचारक आणि आमदार भालकेंची थोडीफार साथ निवडणुकीत यश मिळवून देण्यात पुरेशी ठरणार नाही. मोहिते नसतील तर राष्ट्रवादीला संजय मामांना गळ घालावी लागणार आहे. 

भाजपाकडून मंत्री सुभाषराव देशमुखांनीही  पक्षांतर्गत कुरबुरींचा धसका घेऊन निवडणूकीतून माघार घेतली आहे. पालकमंत्री विजय देशमुखांचा गट साथ देणार नाही हे जाणवल्यानेच त्यांनी गाशा गुंडाळल्याचे समजत आहे. रणजितसिंह मोहिते आणि संजयमामा या दोन पर्यायांचीही चाचपणी भाजपाने केली आहे. एकूणच माढ्यात राष्ट्रवादी आणि भाजपासमोरही उमेदवारीवरुन पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचा ससपेन्स थ्रीलर दिग्दर्शक शरद पवारांनीच तयार केल्याचे जाणवत आहे. परिस्थिती त्यांना हवी तशी तयार होत आहे. मोहितेंची कोलांटी झाल्यानंतर राष्ट्रवादी ससपेन्स थ्रीलरचा उलगडा करण्याची शक्यता आहे. नाईलाज झाल्याचे सांगून शरद पवारच निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. माढ्याची जागा राष्ट्रवादी आणि भाजपाकडूनही प्रतिष्ठेची केली गेली आहे. राष्ट्रवादीला तर बालेकिल्ल्यातील ही जागा राखावीच लागणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या घडणार्‍या घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत.

आता पवारांनीच लढावे...

शरद पवारांनी अगोदर माढ्यातून उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा राष्ट्रवादीअंतर्गत परिस्थिती आलबेल होती. त्यांनी माघार घेतल्यानंतर मात्र चित्र चांगलेच पालटले आहे. राष्ट्रवादी विखुरण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माढ्यातून आता पवार यांनीच लढावे, अशी मागणी माण आणि खटाव तालुक्यातून होऊ लागली आहे.

यादीचा सस्पेन्स त्यामुळेच...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादीच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात माढा व मावळ या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव नाही. मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीर व्हायला हवे होते. तसे न झाल्याने पवार पुन्हा माढ्यातून उतरण्याची शक्यता वाढली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पवारांना तुम्हीच लढले पाहिजे, अशी गळ घातली आहे.