Mon, Sep 16, 2019 05:54होमपेज › Satara › प्रवाशांच्या डोक्यावर एस.टी.चा अधिभार..! 

प्रवाशांच्या डोक्यावर एस.टी.चा अधिभार..! 

Published On: Apr 14 2018 10:33AM | Last Updated: Apr 13 2018 9:04PMसातारा : सुनील क्षीरसागर

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य मिरवणार्‍या राज्य परिवहन मंडळाचा कारभार सातारा जिल्ह्यातील प्रवाशांसाठी डोकेदुखीचा ठरत असून सातार्‍यातील एका रस्त्याच्या कामासाठी सातारा परिवहन विभागाने प्रवाशांच्या तिकिटावर अधिभार वाढवला असल्याने सामान्य प्रवासी एस. टी. अधिकार्‍यांच्या तुघलकी निर्णयाने वेठीस धरले गेले आहेत. या दरवाढीने प्रवाशांमधून संताप व्यक्‍त केला जात आहे. 

सातारा शहरातील प्रसिद्ध आठ रस्त्यावर सध्या ग्रेड सेप्रेटरचे भविष्यातील सोयीच्याद‍ृष्टीने अत्यंत चांगले काम सुरू असून या कामामुळे थोडासा वाहतुकीमध्ये व्यत्यय येत आहे. हा व्यत्यय येत असला तरी त्याबद्दल कोणाचीही अडचण नाही. मात्र, या रस्त्याने कोल्हापूर-बेंगलोरकडे तसेच ग्रामीण भागात जाणार्‍या बसेसना जाता येत नाही.  त्यासाठी सातारा बसस्थानकातून या बसेस सरळ वाढेफाटामार्गे सोडल्या जात आहेत. अर्थात कोणत्याही मार्गाने बसेस सोडल्या तरी प्रवाशांना त्याची काहीच अडचण नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या मार्गाने जाणार्‍या बसेसच्या तिकिटांमध्ये अधिभाराची वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मूळच्या तिकिटावर जादा 6 रुपये अधिभार प्रवाशांच्या डोक्यावर लादला गेला असून या तुघलकी निर्णयाने प्रवासी संतप्त झाले आहेत. 

कोल्हापूर-बेंगलोर अथवा रहिमतपूर - औंधकडे जाणार्‍या बसेसना वाढेफाट्यावरूनच जावे लागत असून केवळ दोन-चार किलोमीटरच्या वाढीव प्रवासासाठी एका स्टेजचा सहा रुपयांचा अधिभार कशासाठी? असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. अगोदरच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत जादा असल्याने प्रवासी हैराण झाले असतानाच हा अधिकचा अधिभार प्रवाशांना आता सोसावा लागणार आहे. परिवहन महामंडळाच्या या कारभारामुळेच प्रवासी त्याला परवडणार्‍या खासगी वाहतुकीकडे वळत आहे.  

वर्षानुवर्षे वापरल्या जाणार्‍या त्याच त्या बसेस, वाढते तिकिटांचे दर, बसेसच्या अनियमित वेळा यांनी प्रवासी अगोदरच मेटाकुटीला आला असताना आता तिकिटासाठी त्याला हा अधिभाराचा सासुरवास काही दिवसांसाठी सहन करावा लागणार आहे. याबाबत एस.टी. प्रशासनानेच निर्णय घेतला असला तरी ज्यांच्या जीवावर एस.टी चालते त्या प्रवाशांचाही महामंडळाने विचार करायला हवा होता, अशा प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांमधून व्यक्‍त केल्या जात आहेत. 

बसेसवर महिन्यातून एकदा तरी पाणी मारा

काही महिन्यांपूर्वी परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आठवड्यातून एक दिवस प्रत्येक आगारात बसेस धुतल्या जाणार होत्या. तसा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यास सांगितले होते. पुढे या निर्णयाचे काय झाले हे परिवहन मंत्र्यांनाच माहित. 1980-90च्या दशकात सुरूवातीला आठवड्यातून एक दिवस आगारातील सर्व बसेस कार्यशाळेमध्ये धुतल्या जात असत. पुढे काही वर्षानंतर हे सर्व बंद झाले. तेथूनच एस.टी.मध्ये अस्वच्छपणा वाढायला सुरूवात झाली.

 

Tags : satara, satara news, st, Satara Transport Department, increased surcharge,