Fri, Jun 05, 2020 01:55होमपेज › Satara › सातारा पालिकेचे ४५ लाख गटारात

सातारा पालिकेचे ४५ लाख गटारात

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 17 2019 1:46AM
सातारा : प्रतिनिधी
सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्याच महिन्यात जिल्हा कारागृह ते मार्केट यार्ड मार्गावर सुमारे 45 लाख रुपये खर्चून बांधलेल्या गटार बंदिस्तीचे काम निकृष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे. पाईपड्रेन करताना काढलेल्या चेंबरची मोठ्या प्रमाणवर दुरवस्था झाली आहे. चेंबरवरील झाकणे बर्‍याच ठिकाणी तुटली असल्याने संबंधित ठेकेदाराकडून काम दर्जेदार झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

सातार्‍यातील काही नगरसेवकांमध्ये पाईपड्रेन करण्याचे मोठे फॅड आहे. वर्षानुवर्षे गटारे स्वच्छ केली जात नसताना गटारांवर झाकणे बसवण्याचे काम प्राधान्याने केले जाते. नगरसेवकांकडून सर्वसाधारण सभेतही अशाच कामांवर चर्चा केली जाते. कदाचित अशी कामे कशीबशी केली तरी त्यातून मलिदा मिळत असल्याने ही कामे मंजूर करुन घेण्यासाठी चढाओढ लागलेली दिसते. सातार्‍यात सध्या काही महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरात सुमारे 25 कोटींच्या भुयारी गटर योजनेचे काम दोन महिन्यांपासून सुरु झाले. शहरातील सर्व मिळकतींपासून निघणारे सांडपाणी भुयारी गटरद्वारे एकत्र करुन ते करंजे तसेच सदरबझार याठिकाणी एकत्र आणून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सांडपाणी हे शुध्द पाण्याचा स्रोत दूषित करते म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने उपाययोजना म्हणून भुयारी गटर योजनेला प्राधान्य दिले असून त्याचाच भाग म्हणून सातारा पालिकेने हा प्रकल्प उभा करण्याचे काम सुरु केले. एकीकडे भुयारी गटर योजनेवर सातारा पालिका स्वत:चा हिस्सा म्हणून कोट्यवधी खर्च  करत असताना काही नगरसेवक पालिकेच्या तिजोरीवर पडणारा हा आर्थिक ताण कमी करण्याऐवजी वाढवत असल्याचे चित्र आहे. भुयारी गटर योजनेचे काम सुरु असताना शहरात ठिकठिकाणी पाईप ड्रेनची कामे करण्यात आली. गेल्याच महिन्यात रविवार पेठेतील पंताचा गोट परिसरात सुमारे 45 लाख रुपयांचे पाईप ड्रेनचे काम करण्यात आले. जिल्हा कारागृहापासून खंडोबाचा माळ ते मार्केट यार्ड मार्गालत असलेले गटार पाईप टाकून बंदिस्त करण्यात आले. आचारसंहितेच्या भितीने हे काम अत्यंत घाईगडबडीने उरकण्यात आले. मात्र, काम करताना ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या चेंबरच्या कट्ट्यांवर पाणी मारले नाही. त्यामुळे कठ्ठे तुटले आहेत. शिवाय ठेकेदाराने  बसवलेल्या चेंबरची झाकणे निकृष्ट आहेत. कामासाठी आणलेल्या ग्रीटमध्ये सिमेंट कालवून ही झाकणे बनवल्याचे परिसरातील लोक सांगत आहेत. रस्ता खाली आणि पाईपड्रेनचे चेंबर वर असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचणार असल्याचे परिस्थिती निर्माण होणार आहे. केवळ जेसीबीने नाला उकरुन त्यात पाईप गाडून चेंबर काढले आहेत. इतकेच काम त्याठिकाणी झाल्याचे दिसते. एवढ्या कामावर जवळपास अर्धा कोट खर्च कसा काय झाला? हे काम प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्र. 7 मध्ये येत आहे. त्यामुळे निकृष्ट काम करत असताना संंबंधित नगरसेवक काय करत होते? त्यांनी या कामाकडे लक्ष का दिले नाही? झालेल्या निकृष्ट कामाची जबाबदारी कुणाची? असा सवाल नागरिक करत आहेत. या कामाची क्‍वॉलिटी कंट्रोलकडून तपासणी करुन दोषी अभियंत्यांवर कारवाई करावी आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत घालावा. त्याला दिलेल्या बिलाची पूर्ण वसुली करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.