Mon, Sep 16, 2019 11:36होमपेज › Satara › रस्त्याकडेच्या झाडांची खुलेआम कत्तल !

रस्त्याकडेच्या झाडांची खुलेआम कत्तल !

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 9:04PM

बुकमार्क करा

कराड : अमोल चव्हाण

शतकोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी केंद्र शासन प्रयत्न करत असतानाच रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कराड ते कोयनानगर दरम्यान खुलेआम वृक्षांची कत्तल केली जात आहे. मोठमोठ्या वृक्षांवर यांत्रिक कटर चालविला जात असल्याने झाडे जमीनदोस्त होत आहेत. यामुळे रस्त्याकडेची वृक्षसंपदा नष्ट होत असून झकास रस्ता भकास होऊ लागला आहे. याबाबत वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून विकासाच्या नावाखाली सुरू असलेली पर्यावरणाची हानी भविष्याची चिंता वाढवणारी ठरत आहे.

राज्य शासनाबरोबरच मोदी सरकार पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. शासकीय पातळीवर वृक्षलागवडीच्या मोहिमेला मोठे यशही आले. परंतु, सध्या या योजनेला विकासाच्या व रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ठेकेदाराकडून तिलांजली देण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा विकास पर्यावरणाला भकास तर करत नाही ना? असा प्रश्‍न निर्माण होतो. कराड ते कोयनानगर पर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे.

हा रस्ता चौपदरीकरण करण्यात येणार असून तो सिमेंटचा बनविला जाणार आहे. त्यासाठी सध्या युध्द पातळीवर काम सुरू आहे. हा रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांची तोड केली जात आहे. झाडे तोडल्याशिवाय रुंदीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे ठेकेदाराने साकुर्डी फाटा ते कोयनानगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या वृक्षांची कत्तल करण्यास सुरुवात केली आहे.

या वृक्षतोडीमुळे हा रस्ता भकास होऊ लागला असून रस्त्यावरील झाडांची प्रवाशांना मिळणारी सावली नष्ट होत आहे. छोट्या-मोठ्या सर्व झाडांवर यांत्रिक कटर चालविला जात आहे. त्यामुळे काही क्षणात झाडे जमीनदोस्त होत आहेत. तोडलेली झाडे कामगारांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून कुठे नेली जातात याबाबत कामगारांनाही काही सांगता येत नाही. त्यामुळे तोडलेल्या झाडांचे पुढे काय होते हे समजू शकले नाही. रस्त्याकडेच्या झाडांच्या सुरू असलेल्या तोडीबाबत पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. जेवढी झाडे तोडली जातील त्या बदल्यात दुसर्‍या ठिकाणी झाडांचे रोपण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. याची संबंधित ठेकेदाराने दखल  घेतली नाही तर पर्यावरणप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

रस्ता उकरल्याने 21 कोटी पाण्यात...

वारुंजी फाटा ते विजयनगरपर्यंत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 21 कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. याला दोन वर्षे पुर्ण होण्यापुर्वीच पुन्हा हा रस्ता उकरण्यात आला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांनी या रस्त्यासाठी दिलेले 21 कोटी रुपये पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात असून संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसने यासाठी चार दिवसांपूर्वी आंदोलनही केले आहे.  

झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण करावे... 

एखादे रोप लावल्यानंतर त्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर व्हायचे असेल तर त्याला अनेक वर्षे जावी लागतात. कराडपासून कोयनानगरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक लहान-मोठी वृक्ष आहेत. ही झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे. तसे केले तर झाडेही सुरक्षित राहतील आणि पर्यावरणाची हानी होणार नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी ठेकेदाराला झाडांची तोड करण्यापेक्षा त्यांचे पुनर्रोपण करण्यास सांगावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

कटरच्या सहाय्याने काही क्षणात झाड जमीनदोस्त.. 

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांची कत्तल करण्यासाठी ठेकेदाराने मजूरांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. या मजूरांकडून कटरच्या सहाय्याने काही क्षणात भलेमोठे झाडही काही क्षणात जमिनदोस्त होत आहे. तोडलेल्या झाडांचे रस्त्यावर पडलेले ओंडके ट्रॅक्टर तसेच मजूरांच्या सहाय्याने बाजूला करण्यात येत आहेत. त्याचा रस्त्याच्या कडेलाच ढीग मारून पुन्हा ट्रकमध्ये भरून नेत आहेत.

धोकादायक झाडे हटविण्याची मागणी

अनेकदा निवेदनही देऊन उंडाळे -सवादे रस्त्यावरील झाडे व फांद्या न तोडणी केल्याने सवादे नजीकच्या वळणावर अपघाताचा धोका वाढला आहे. बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत गप्प बसला आहे. या गप्प राहण्याचा अर्थ म्हणजे या विभागाला  मोठा अपघात हवा आहे का? अशी सतंप्त प्रतिक्रिया वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे. 
उंडाळे -सवादे गावच्या दरम्यान स्मशानभूमीच्या नजीक उंडाळे वरून सवादेकडे येताना एक मोठे वळण आहे. या वळणावर झाडा-झुडपांची मोठी गर्दी असून एक मोठे झाड आहे. या झाडामुळे दोन्ही बाजूनी येणार्‍या वाहन चालकांना पुढचे येणारे वाहन दिसत नाही.

याच कारणाने अनेकदा वाहनधारकाचा अपघात होतो. यामुळे वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले व धोकादायक झाडे व फांद्या हटवाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, बाधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही वाहनधारकांनी केला आहे. बांधकाम विभागाला या वळणावर मोठा अपघात हवा आहे का? यासाठीच ती झाडे तोडायची नाहीत, असे ही वाहनधारक बोलत आहेत. चार दिवसांत ही झाडे न तोडल्यास वाहनधारक वेगळा विचार करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.