Wed, Jun 19, 2019 08:30होमपेज › Satara › किडगावमध्ये राडा; 20 जणांवर गुन्हा 

किडगावमध्ये राडा; 20 जणांवर गुन्हा 

Published On: Oct 12 2018 1:02AM | Last Updated: Oct 11 2018 11:44PMसातारा : प्रतिनिधी

ट्रॅक्टर पुढे घेतल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री किडगाव (ता. सातारा) येथील महादेव मंदिर तसेच ग्रामपंचायतीजवळ दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याने एकूण 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ज्ञानेश्‍वर राजाराम वाघमळे हे बुधवारी रात्री ट्रॅक्टर घेऊन गावातील महादेव मंदिराजवळ असणार्‍या तिकाटण्यावर आले होते. या मार्गावरून देवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी मिरवणूक निघाली होती. मिरवणूक तसेच एका पाठोपाठ दोन बसेस तेथे आल्याने वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे वाघमळे यांनी ट्रॅक्टर पुढे घेतला. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून अक्षय विठ्ठल इंगवले, अक्षय मारुती इंगवले, गौरव प्रदीप इंगवले, मयूर संपत इंगवले, प्रवण शंकर टिळेकर, अनिकेत राजेंद्र इंगवले व इतर 10 ते 12 जणांनी लाकडी दांडक्याने वाघमळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्यांवरही त्यांनी हल्ला चढवला. यात सुहास जाधव, भागवत जाधव, अक्षय जाधव, ओमकार जाधव, अमजद कुरेशी हे जखमी झाले आहेत. वाघमळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गौरव इंगवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याचप्रकरणी संगीता प्रदीप इंगवले यांनी तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दि. 10 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास राहत्या घराजवळ तसेच गावातील कॅनॉलजवळ जमावाने अक्षय विठ्ठल इंगवले याला मारहाण केली. तसेच जमावाने घरात घुसून मुलगा कोठे आहे, असे विचारत तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार ज्ञानेश्‍वर राजाराम वाघमळे, अमजद रमजान मोकाशी, हनुमान जाधव, भागवत जयसिंग जाधव, ओंकार महादेव जाधव, सुहास शिवाजी जाधव, अक्षय भानुदास जाधव, पप्या ननावरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मारहाणीत अक्षय विठ्ठल जाधव हा जखमी झाला आहे. दरम्यान, या राड्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास उपनिरीक्षक विजय चव्हाण व गीते करत आहेत.