Sat, Sep 21, 2019 06:52होमपेज › Satara › पोकलॅन ऑपरेटरचा खून

पोकलॅन ऑपरेटरचा खून

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 11:44PMम्हसवड : प्रतिनिधी

कुकुडवाड, ता. माण येथील पाणी फाऊंडेशनच्या कामावर काळवाटाच्या शिवारात मशिनरीचे काम सुरू असून  सोमवारी सकाळी पोकलॅन मशिन चालवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या  वादातून ऑपरेटर सोनूकुमार राम (वय 23, मूळ रा. झारखंड) याचा खून झाला आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी संतोष (पूर्ण नाव माहीत नाही) पसार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून म्हसवड पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, कुकुडवाड येथील राजेंद्र काटकर यांच्या काळवाट नावाच्या शिवारात पाणी फाऊंडेशनचे काम सुरू आहे. या कामावर धनेश सदाशिव घनवट (रा. आगोती, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या पोकलॅनवर संतोष (पूर्ण नाव माहीत नाही, रा. आळंद, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) व सोनूकुमार राम (वय 23) हे दोघेही ऑपरेटर म्हणून काम करत होते. गत 44 दिवस पोकलॅन चालवण्याचे काम दोघांनी केले.

पाणी फाऊंडेशनचे काम दोन दिवस बाकी असताना या ठिकाणी सोनूकुमार व संशयित आरोपी संतोष यांच्यात  पोकलॅन मशिन कोणी चालवायचे यातून रविवारी रात्री  वाद झाला. याच वादाच्या रागातून संतोष याने सोमवारी  सकाळी धारदार शस्त्राने सोनूकुमार राम याच्या पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. सोनूकुमार राम याच्या पोटातून आताडी बाहेर आल्याने जाग्यावरच मृत्यू झाला. दरम्यान, दोघेही पाणी फौंडेशनच्या कामासाठी पोकलॅन चालवण्याचे काम करत होते.

या घटनेनंतर आरोपी संतोष फरार झाला आहे. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे यांनी घटनास्थळी भेट दिली सपोनि मालोजीराव देशमुख यांनी तपास सुरू केला असून कुकूडवाडच्या निनूबाई डोंगरवर आरोपी संतोषची पिशवी सापडली असून त्यामध्ये त्याची कपडे सापडली आहेत. घटनास्थळाचा पंचनामा सपोनि देशमुख पोलिस हवलदार खाडे सानप कुकुडवाडचे पोलिस पाटील वैशाली काटकर यांनी केला.