Sun, Aug 18, 2019 07:00होमपेज › Satara › पाचगणीतील शाळेत विद्यार्थ्याचा मानसिक छळ, पालकांची पोलिसात तक्रार(Video) 

पाचगणीतील शाळेत विद्यार्थ्याचा मानसिक छळ, पालकांची पोलिसात तक्रार(Video) 

Published On: Feb 12 2019 2:34PM | Last Updated: Feb 12 2019 2:34PM
सातारा  : प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्‍हणून समजला जाणार्‍या शिक्षणाची पंढरी पाचगणीतील पाइनवूड स्कूल विरोधात एका विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. पाचवीतल्या विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी पाचगणी पोलिस स्टेशनमध्ये  दाखल केली आहे. यासंदर्भात पाचगणी पोलिसांनी शाळा प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

यासंदर्भात पालकांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील रहिवासी असणारे पवन कोलते यांचा मुलगा ऋषि कोलते हा इयत्‍ता पाचवीमध्ये पाइनवूड स्कूलमध्ये शिकत आहे. या मुलाला शाळेमध्ये मानसिक त्रास दिला जात असून, त्‍याला उपाशी ठेवण्याचे क्रूर कृत्य शाळा प्रशासनाने केला असल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.

तसेच आजारी असताना देखील उपचारासाठी घेऊन न गेल्याचा आरोप पालकांनी केला असून, आमचा मुलगा भीतीच्या छायेखाली आहे. शाळा प्रशासनाकडून वारंवार आमच्या मुलाला त्रास दिला जात आहे, अशी तक्रार पालकांनी पाचगणी पोलिस ठाण्यांमध्ये केली आहे. 

दरम्यान पालकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पाइनवुड शाळेमध्ये शाळा प्रशासनाकडून मुलांना मारहाणही करण्यात येते, तसेच शाळेमध्ये काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याच्या जवळ गांजा ही सापडला होता, असे प्रकार या शाळेमध्ये होत असल्याने या शाळेचा परवाना रद्द करावा अशी मागणीही पालकांनी केली आहे. 

शाळेकडून लाखो रूपये डोनेशन घेतले जाते, तसेच फी घेतली जाते. मात्र शाळेत विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शाळेमध्ये स्‍वच्‍छतेचा अभाव आहे. फी घेऊन पुण्या-मुंबईतून येणार्‍या पालकांची केवळ फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारही कोलते यांनी केली आहे. त्याचबरोबर पायनर शाळेतील मुख्याध्यापिका, संस्थापक यांच्या दंडेलशाहीचा प्रत्यय अनेक पालकांना आला असून, राजकीय नेत्यांचा पाठबळ असल्याने कोणीही काही करू शकत नाही असे शाळेचे मुख्य अध्यक्ष सांगतात, असे तसेच अनेक पालकांना धमकावण्याचे प्रकारही होत असल्‍याचा आरोप पालकांनी केला आहे.