Mon, Sep 16, 2019 05:41होमपेज › Satara › ‘जिथे कमी, तिथे एनडीआरएफ टीम’

‘जिथे कमी, तिथे एनडीआरएफ टीम’

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:35PMसातारा : योगेश चौगुले

आंबेनळी घाटात शनिवारी अपघात झाल्यानंतर अवघ्या तासाभरात मदत कार्याला सुरूवात झाली. यामध्ये पुण्याच्या एनडीआरएफच्या टीमने महत्वपूर्ण भूमिका बजावली. या टीमकडून देशातील प्रत्येक भागात आपत्तीजनक परिस्थितीतून लोकांना बाहेर काढण्याचे व वाचवण्याचे काम केले जाते. त्यामुळेच ‘जिथे कमी तिथे एनडीआरएफ’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याचा प्रत्यय शनिवारच्या घटनेमध्ये आला. त्यामुळे एनडीआरएफच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्यांसह सार्‍यांनाच कुतूहल आहे. 

एनडीआरएफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. केंद्र सरकारने विशेष नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती हातळण्यासाठी हे पथक तयार केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005  नुसार या पथाकाच्या स्थापनेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.एनडीआरएफ हे पूर, भूकंप, त्सुनामी, वादळ यासारख्या नैसर्गिक संकटांसोबतच, न्यूक्लिअर रेडिएशन, केमिकल लिकेज, इमारत कोसळणे किंवा ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, यांसारख्या संकटांचा कौशल्याने सामना करते. अशा संकटात सापडलेल्या लोकांना मदत करते. 

सध्या एनडीआरएफ दहा तुकड्यांची मिळून बनली आहे. यामध्ये बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलिस दल, सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि आयटीबीपी म्हणजे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस दल (जे कसाबच्या सुरक्षेसाठी होते ते) यांची पथक आहेत.प्रत्येक तुकड्यांमध्ये विशेष प्रशिक्षित 45 जवानांचा समावेश असतो. यामध्ये इंजिनियर्स, टेक्निशियन्स, इलेक्ट्रिशन्स, डॉग स्क्वॉड आणि मेडिकल अशा तज्ञांचा समावेश असतो. प्रत्येक तुकडी ही 1149 जवानांची बनलेली असते. या दहाही तुकड्या कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यास सर्व साहित्यांनीशी सज्ज असतात. 

कोणत्याही आपत्तीचा कौशल्याने सामना करण्यासाठीच एनडीआरएफच्या जवानांना प्रशिक्षण दिले जाते. एनडीएमए अर्थात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅथोरिटीने एनडीआरएफचे प्रशिक्षण आणि सिलॅबसची रचना केली आहे. यामध्ये जवानांना पूर, भूंकप, वादळ, त्सुनामी आदी आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना कशी मदत करायची, वैद्यकीय सुविधा, हवाई प्रशिक्षण, डॉग स्कॉड हाताळणे, शोध आणि बचावकार्य आदींचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय या जवानांना परदेशातील विशेष प्रशिक्षकांकडूनही प्रशिक्षण दिले जाते. देशात एनडीआरएफची पथके 10 ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी एनडीआरएफचे पथक आहे. हे सीआरपीएफ अंतर्गत आहे.

नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा आपत्तींचा सामना करण्याच्या उद्देशाने एनडीआरएफची स्थापना झाली आहे. त्यानुसार एनडीआरएफने यापूर्वी देशभरातील आपत्तीमध्ये यशस्वी मोहीमा पार पाडल्या आहेत. यामध्ये पूर, भूकंप, वादळ, इमारत दुर्घटना आदींचा समावेश आहे. एनडीआरएफने 2010 पर्यंत केलेल्या बचावकार्यात तब्बल 1,33,192 हून अधिक लोकांचा जीव वाचवला आहे. तर विविध आपत्तींमध्ये 250 हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत.